अमित शाह यांचे होर्डिंग्ज महापालिकेने उतरविले
By admin | Published: June 17, 2017 02:21 AM2017-06-17T02:21:40+5:302017-06-17T02:21:40+5:30
युतीमधला वाद मिटवण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबई दौऱ्यावर असल्याचे बोलले जात आहे. मात्र ही भेट होण्यापूर्वीच शिवसेनेची सत्ता असलेल्या
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : युतीमधला वाद मिटवण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबई दौऱ्यावर असल्याचे बोलले जात आहे. मात्र ही भेट होण्यापूर्वीच शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेने भाजपाच्या प्रयत्नांना सुरुंग लावला आहे. आपल्या अध्यक्षांच्या स्वागतासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यांच्या दुतर्फा लावलेले फलक महापालिकेने शुक्रवारी खाली उतरविले आहेत.
महापालिका स्वबळावर लढणाऱ्या भाजपाला मोठे यश मिळाले. मात्र काही आघाडींवर भाजपाला शिवसेनेशी जुळवून घेणे भाग आहे. गेल्या काही महिन्यांत शिवसेना-भाजपामधील वाद शिगेला पोहोचले आहेत. त्यामुळे अमित शाह यांचा मुंबई दौरा विशेष असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच अमित शाह हे उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेणार असल्याने चर्चेला उधाण आले आहे. मात्र शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेने या बैठकीआधीच फलक उतरविण्यास सुरुवात केली आहे. अमित शाह यांचे बहुतांश कार्यक्रम व मुक्काम सह्याद्री अतिथी गृह, मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान या ठिकाणी आहेत. महापालिकेने नेमके याच परिसरातील फलक उतरविले आहेत. यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
व्यापारी व उद्योजक यांच्या होर्डिंग्जवर प्रशासन बऱ्याचदा कारवाई करीत नाही. पण राजकीय पक्षांच्या होर्डिंग्जवर मात्र कारवाई केली जाते. शिवसेनेच्या होर्डिंग्जवरसुद्धा कारवाई होत असते. त्यामुळे या कारवाईबद्दल आयुक्त किंवा संबंधित अधिकारी अधिक सांगू शकतील, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले.
मुंबईत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे वाढदिवस, कार्यक्रमांनिमित्त अनधिकृतपणे बॅनर्स लावले जातात. यंदाच्या जानेवारी ते मे या पाच महिन्यांत सुमारे साडेतीन हजार बॅनर्स, पोस्टर्स झळकले होते. राजकीय पक्षांच्या १,२७८ बॅनर्सचा यात समावेश होता. शाह आणि ठाकरे यांच्या भेटीमुळे सेना-भाजपातील कटुता दूर होईल, असे वाटत होते. मात्र शाह यांचे फलक उतरविण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे.