Join us  

मुले बुडाल्याने अमरनगर अस्वस्थ

By admin | Published: June 26, 2016 4:18 AM

पावसाच्या जोरदार सरी कोसळत असतानाच, शुक्रवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास मुलुंड पश्चिमेकडील अमरनगर येथील नाल्यात दोन मुले बुडाल्याची घटना घडली.

मुंबई : पावसाच्या जोरदार सरी कोसळत असतानाच, शुक्रवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास मुलुंड पश्चिमेकडील अमरनगर येथील नाल्यात दोन मुले बुडाल्याची घटना घडली. या दोन्ही मुलांना हायलँड पार्क नाल्यातून बाहेर काढत, मुलुंड अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अफताब इरफान खान(१५) याचा मृत्यू झाला, तर अरबाज हसन अन्सारी (१२) याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे अमरनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खार पश्चिम येथील खारदांड्यातील मधला पाडा येथील दोनमजली चाळीच्या पहिल्या मजल्याच्या बाल्कनीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या १७ लोकांना जिन्याच्या मदतीने खाली उतरवण्यात आले. इस्माईल युसूफ महाविद्यालयासमोरील संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली, शिवाय अंधेरी पूर्वेकडील गणेशपाडा येथे मागील बाजूस असलेल्या टेकडीवरील दगड पार्किंगच्या आवारातील वाहनावर पडले. घाटकोपरमधील अमृतनगरमध्ये दरडीचे दोन ते तीन दगड संरक्षक भिंतीवर कोसळले. परिणामी, येथील भिंत पडली. येथील १५ खोल्या रिकाम्या करण्यात आल्या असून, रहिवाशांची तात्पुरती व्यवस्था लगतच्या सिद्धशेवर मित्रमंडळाच्या जागेत करण्यात आली. कुर्ला पूर्वेकडील ताडवाडी चाळीतील खोल्यांच्या पत्र्यावर दरडीमधील दगड कोसळल्याने वित्तहानी झाली. (प्रतिनिधी)ठाण्यातही पाऊसठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, मिरा-भार्इंदर आणि मुरबाड, शहापूर आदी तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात सरासरी ४६ मिमी पावसाची नोंद झाली. शनिवारी जोरदार पाऊस कोसळत असूनही रेल्वे वाहतूक बंद न पडल्याने, त्यामुळे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. अप/डाउन दोन्ही दिशांवर धिम्या-जलदच्या लोकल सुमारे १५-२० मिनिटे विलंबाने धावत होत्या. सकाळसह दुपारच्या सत्रात एवढ्याच विलंबाने लोकल धावत होत्या. संध्याकाळीही पावसाचा जोर ओसरला नव्हता, पण लोकल धावत असल्याने चाकरमान्यांना परतीच्या प्रवासातही त्रास झाला नाही.