Join us

अमर्त्य सेन आज भारतीयाशी संवाद साधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:06 AM

फेसबुक लाईव्हमध्ये गांधी, गणेश देवीचाही सहभागलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आर्थिक संकट, त्यात जैविक आणि वैचारिक काेरोनाचे ...

फेसबुक लाईव्हमध्ये गांधी, गणेश देवीचाही सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आर्थिक संकट, त्यात जैविक आणि वैचारिक काेरोनाचे संकट. त्याचा सामना कसा करायचा, या विषयावर नोबेल परितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. अमर्त्य सेन येत्या शुक्रवारी भारतीयांशी फेसबुक लाईव्ह संवाद करणार आहेत.

राष्ट्र सेवादलाने आयोजित केलेल्या बायोलॉजिकल आणि आयडियोलॉजिकल कोरोनाच्या विरोधात `फ्रायडेफ्लेम'' (#FridayFlame) ऑनलाईन अभियानाच्या समारोपात रात्री ८ वाजता ते बोलणार आहेत. यावेळी महात्मा गांधीचे नातू प्रा. राजमोहन गांधी अध्यक्षस्थानी असतील.

राष्ट्र सेवादलाचा ४ जून हा स्थापना दिन निर्धार दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय अध्यक्ष व जागतिक कीर्तीचे भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या निमंत्रणावरून हे दोन्ही दिग्गज देशाला संबोधित करणार आहेत. देशभरातील सेवादल व समविचारी चळवळीतील कार्यकर्ते, लेखक, कलावंत आणि पत्रकार या कार्यक्रमात समाविष्ट झाले आहेत. सेवादलाचे राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख यांनी ही माहिती दिली.

मालिका साराभाई, नंदिता दास, इंदिरा जयसिंग, कन्हैया कुमार, अशोक वाजपीय, रावसाहेब कसबे, सईदा हमीद, निखिल वागळे, डॉ. झहीर काझी, नितीन वैद्य, एयर मार्शल मातेश्वरन, ओरदेता मेंडोसा, कपिल पाटील आदींनी आजवरच्या फ्रायडेफ्लेममध्ये हजेरी लावली आहे.

लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा आणि बंधुता या संविधानिक मूल्यांशी कटिबद्धता राखत राष्ट्र सेवादल काम करत आहे. कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या प्रती सहवेदना आणि फॅसिझम विरोधात लोकशाही निर्धार व्यक्त करण्यासाठी ४ जूनला देशभरातील कार्यकर्त्यांनी एक दिवसाचा उपवास करावा, असे आवाहन डॉ. गणेश देवी यांनी केले आहे. आतापर्यंत ११ हजार कार्यकर्त्यांनी नोंदणी केली आहे.