Join us  

पंचाहत्तरीतील अशोक सराफांची ऊर्जा पाहून थक्क, राज ठाकरेंनी सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 11:43 AM

नुकतंच मी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत ह्यांचं 'व्हॅक्युम क्लिनर' हे नाटक पाहिलं. व्हॅक्युम क्लिनरच्या 'धक्क्याने' नात्यांमध्ये निर्माण झालेले ताण दूर होतात हे पाहताना मजा आलीच.

महाराष्ट्र नवनिर्माण सेने(MNS)च्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे भव्य दिपोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी राजकीय नेत्यांसोबत कलाकारांनीदेखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्राची हास्यजत्रा(Maharashtrachi Hasyajatra)मधील कलाकारांनी देखील दिपोत्सवाला उपस्थिती लावली. यावेळी या कलाकारांना राज ठाकरे यांना भेटल्यानंतर आलेला अनुभव फोटो शेअर करत व्यक्त केला. आता, राज ठाकरे यांनी एका कलाकारासोबतचा अनुभव फोटोसहित शेअर केला आहे. ते म्हणजे मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे अशोक सराफ. राज ठाकरेंनी अशोक सराफ यांचे नाटक पाहून प्रतिक्रियाही दिली. 

नुकतंच मी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत ह्यांचं 'व्हॅक्युम क्लिनर' हे नाटक पाहिलं. व्हॅक्युम क्लिनरच्या 'धक्क्याने' नात्यांमध्ये निर्माण झालेले ताण दूर होतात हे पाहताना मजा आलीच. पण, वयाची ७५ पूर्ण केलेल्या अशोक सराफ ह्यांची ऊर्जा आणि रंगमंचावरचा वावर पाहून थक्क व्हायला झालं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. तसेच, निर्मिती सावंत यांचा बहारदार अभिनय आणि संचातील इतर सगळ्याच कलाकारांचा अभिनय मस्त होता. ह्या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-कलाकार, तंत्रज्ञ ह्या सगळ्यांचंच मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देखील, असा मेसेज राज यांनी लिहिला आहे. 

मराठी कलाकारांनी घेतली होती भेट

दिवाळीनिमित्त मराठी कलाकारांनी राज ठाकरेंसोबतचे फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या होता. कॉमेडी क्वीन वनिता खरात (Vanita Kharat) हिने इंस्टाग्रामवर राजामाणूस म्हणत राज ठाकरेंच्या भेटीचं वर्णन केलं होतं. वनिताने इंस्टाग्रामवर राज ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून तिने लिहिले की, दिवाळी विशेष. यावर्षीची दिवाळी खरंच खूप खास होती कारण शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसून कित्येक वर्षे ज्या गोष्टीची वाट पाहिली ती गोष्ट घडली. शिवतीर्थावर जाण्याचा योग आला. कट्टा ते शिवतीर्थ हे २ मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी १० वर्षे गेली.

टॅग्स :राज ठाकरेअशोक सराफमराठी अभिनेतासिनेमा