मुंबई - नवरात्रीच्या मुहूर्तावर फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या शॉपिंग साईट्सने ऑनलाईन खरेदीवर मोठ्या ऑफर सुरू केल्या आहेत. इंग्रजी, हिंदी आणि दक्षिणेतील काही भाषांसह हे अॅप भारतात काम करतात. पण, या अॅपसाठी मराठी भाषेचा वापर होत नसल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी येत्या सात दिवसांत त्यांचं अॅप मराठी भाषेत सुरू करावं, अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईलने होईल, असा इशारा मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. मात्र आता मनसेच्या या भूमिकेची अॅमेझॉनने दखल घेतली आहे.
अखिल चित्रे यांनी अॅमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात ई-मेल पाठवला होता. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांच्या वतीने 'अॅमेझॉन.इन'च्या जनसंपर्क विभागाने त्याला आता प्रतिसाद दिला आहे. "बेजॉस यांना आपला मेल मिळाला आहे. अॅमेझॉन अॅपमधील त्रुटींमुळे आपल्याला जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित विभागाला तुमच्या तक्रारीबद्दल कळवण्यात आलं असून लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल"असं अॅमेझॉनने स्पष्ट केलं आहे.
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी घेतली दखल
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अखिल चित्रे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. "अॅमेझॉनच्या डिजिटल सेवेत (Trading App) मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी घेतली दखल. अॅमेझॉनचं शिष्टमंडळ आज मुंबईत... राजसाहेब म्हणतात तसं... तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं" असं ट्विट अखिल यांनी केलं आहे.
मराठी भाषेत हे अॅप कार्यरत नसल्याने मनसेची नाराजी
अखिल चित्रे यांनी याआधी "अॅमेझॉन व फ्लिपकार्ट या बंगळुरू स्थित कंपन्यांनी दक्षिणी भाषांना प्राधान्य देत महाराष्ट्रात मराठी भाषेला डावलले आहे. तरी, @Flipkart @amazonIN ह्या कंपनी व्यवस्थापनाला त्यांच्या मुख्य कार्यालयात जाऊन @mnsadhikrut दणका दिला" असं ट्विट केलं होतं. तसेच महाराष्ट्रात गेल्या 5 ते 6 वर्षांपासून या कंपन्या कार्यरत आहेत. इंग्रजी, हिंदी या भाषेतून कंपनीतर्फे ग्राहकांसोबत व्यवहार केले जातात. विशेष म्हणजे दक्षिण भारतातील तमिळ, तेलुगू या भाषांमध्येही हे अॅप कार्यरत आहेत. मात्र, मराठी भाषेत हे अॅप कार्यरत नसल्याने मनसेने नाराजी व्यक्त केली होती.