लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चांदिवलीतील ॲमेझॉनच्या गोदामाची काही लोकांनी शुक्रवारी तोडफोड केली. यामागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी शुक्रवारी उशिरा रात्री सात ते आठ अनोळखी व्यक्तींविराेधात साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे.
ॲमेझॉनच्या चांदिवली येथील गोडाऊनमध्ये शुक्रवारी मनसेच्या नावाने घोषणा देत सात ते आठ जण शिरले. त्यांनी गोडाऊनमधील स्क्रीन, दोन लॅपटॉप तसेच एक प्रिंटर अशा सामानाची तोडफोड केली. अवघ्या दोन ते अडीच मिनिटांत ताेडफाेड करून ते घटनास्थळाहून निघून गेले, अशी तक्रार ॲमेझाॅनच्या अधिकाऱ्यांनी केली. तोडफोड करणाऱ्या व्यक्ती या मनसेचे कार्यकर्ते असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार साकीनाका पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून आठ जणांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल केला.
दरम्यान, एफआयआर दाखल करण्यात आला असून संबंधितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत यांनी दिली.
‘नाे मराठी, नाे ॲमेझॉन’ ही माेहीम मनसेने सुरू केली आहे. ॲमेझाॅन ॲप तसेच पोस्टरवर मराठी भाषेचा समावेश करण्याची त्यांची मागणी आहे. ॲमेझाॅनने याप्रकरणी दिंडोशी कोर्टात धाव घेतल्यानंतर काेर्टाने ५ जानेवारी, २०२१ रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावली. त्यामुळे चिडलेल्या मनसे सैनिकांनी हा प्रकार केल्याचा संशय आहे.
..........................................