सात दिवसांत करणार मराठीचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘मराठी नाही तर ॲमेझॉन नाही’ अशी आक्रमक भूमिका घेत ॲमेझॉनवर मराठी भाषेचा समावेश करण्याची मागणी केली होती. या मागणीवरून मनसैनिकांनी पुणे आणि मुंबईत ॲमेझॉनचे कार्यालय व वेअरहाउसवर धडक देत तोडफोड केली. मनसेची मागणी मान्य करत येत्या सात दिवसांत ॲमेझाॅनवर मराठीचा समावेश करू, असे आश्वासन ॲमेझाॅनने दिले आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील कोंढवा येथील ॲमेझॉनचे कार्यालय फोडले तसेच मुंबईत चांदिवली येथील ॲमेझॉनच्या वेअरहाउसलाही लक्ष्य करण्यात आले होते. मनसेचा हा आक्रमक पवित्रा पाहून ॲमेझॉनने चर्चेसाठी पुढाकार घेतला. मनसे नेते बाळा नांदगावकर, अखिल चित्रे यांना ॲमेझॉनकडून ई-मेल आला आहे. त्यात ॲमेझॉनवर येत्या सात दिवसांत मराठीला स्थान देण्याची तयारी दर्शवताना ‘नो मराठी, नो ॲमेझॉन’ ही मोहीम स्थगित करण्याची विनंती करण्यात आली. याबाबत अखिल चित्रे यांनी माध्यमांना माहिती दिली.
आम्हाला आश्वासन नको, प्रत्यक्ष कृती हवी, असे आम्ही ॲमेझॉनला सांगितले असून राज ठाकरे यांचीही त्यांनी माफी मागायला हवी, अशी आमची मागणी असल्याचे चित्रे म्हणाले.
‘नो मराठी, नो ॲमेझॉन’, असे फलक मुंबईत सर्वत्र लावत मनसेने जोरदार मोहीमही उघडली होती. या पार्श्वभूमीवर ॲमेझॉनने मनसेविरुद्ध मुंबईतील दिंडोशी येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. ॲमेझॉनच्या याचिकेवरून न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेत्यांना नोटिसा बजावल्या.