नागोठणे : येथील अंबा नदीत अचानक आलेल्या डॉल्फिन माशाला यशस्वीरीत्या पुन्हा माघारी पाठविण्यात वनखात्याला यश आले आहे. मध्यरात्रीच्या दरम्यान नदीत भरतीचे पाणी चढण्यास सुरुवात झाल्यानंतर या माशाने पुन्हा समुद्राकडे जाण्याचा मार्ग स्वीकारल्याने आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर डॉल्फिन आॅपरेशन मोहीम यशस्वीरीत्या संपुष्टात आली आहे. बुधवारी सकाळी अकराच्या दरम्यान येथील अंबा नदीत मोठा मासा आला असल्याचे एका स्थानिक मच्छीमाराला दिसल्याने त्याने नागोठणेत याबाबतची माहिती दिली. या माशाचा शहरात गाजावाजा झाल्याने मासा बघण्यासाठी अंबा नदी किनाऱ्याला जत्रेचे स्वरूप आले होते. चार ते पाच फूट लांबीचा प्रचंड आकाराचा डॉल्फिन असल्याचे काही वेळानंतर स्पष्ट झाले. दुपारी उशिरानंतर येथील वनखात्याचे वनाधिकारी बी. व्ही. पाटील यांनी ठाणे व मुंबई येथील वनखात्याच्या कांदळवन विभागाला कळविल्यानंतर सायंकाळनंतर या विभागाचे मुख्य वनसंरक्षक वासुदेवन यांच्या नेतृत्वाखाली फिरत्या पथकाचे सहाय्यक वनसंरक्षक मसुरकर, एम. बी. घोडके, अधिकारीवर्ग, तज्ज्ञ मंडळींसह येथे दाखल झाले. या पथकाला सहकार्य करण्यासाठी नागोठणेसह पाली, वडखळ, पेण, पोयनाड, अलिबाग येथील वनखात्याचे शंभर कर्मचारी व अधिकारी तैनात होते. सूचनेनुसार नागोठणे ग्रामपंचायतीची स्पीड बोट, कोळीबांधवांच्या होड्या तसेच इतर साहित्याची तयारी करण्यात आली होती. हा मासा सुरक्षित पकडून त्याला पुन्हा समुद्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात त्याप्रमाणे मोहिमेस प्रारंभ झाला. मात्र, त्याचदरम्यान मध्यरात्री भरतीचे पाणी भरावयास सुरुवात झाल्याने नदीतील पाण्याची पातळी वाढली व त्यामुळे या माशाचा परतीचा मार्ग सुकर झाल्याने धरमतर खाडीमार्गे तो समुद्राकडे माघारी फिरला. (वार्ताहर) आठ तासांनी मोहीम फत्तेनदीच्या परिसरात अधिकारीवर्गाने होड्यांतून फिरून माशाचा शोध घेतल्यानंतर तो कोठेही आढळून न आल्याने डॉल्फिन समुद्रातच गेला, असा निष्कर्ष काढण्यात येऊन आठ तासांची ही मोहीम यशस्वीरीत्या संपुष्टात आली असल्याचे वनखात्याकडून जाहीर करण्यात आले. दरम्यान, बुधवारी या डॉल्फीनला पाहण्यासाठी अंबा नदी काठी जत्रा जमली होती. यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते.
अंबा नदीतील ‘डॉल्फिन नाट्य’ मध्यरात्री पूर्ण
By admin | Published: July 02, 2015 11:37 PM