लोकसभेसाठी सर्व पक्षांकडून उमेदवारांच्या घोषणा सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गट आज उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या मतदारसंघात विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही लोकसभेसाठी इच्छुक होते, यामुळे आता दानवे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, अंबादास दानवे यांनी फोनही बंद ठेऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होत्या. दानवे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे, यावर आता स्वत: अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
वंचित आघाडीबाबत सायंकाळपर्यंत फायनल निर्णय; मविआची उद्या यादी; सुप्रिया सुळेंनी केले स्पष्ट
सत्ताधाऱ्यांकडून फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी फोन बंद केल्याची माहिती समोर आली आहे. दानवे सध्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहे. आपण ठाकरे गट सोडून कुठेही जात नसल्याचे स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिले आहे.
अंबादास दानवे म्हणाले, आज उमेदवार यादी जाहीर होणार आहे. या यादीत माझं नाव असणे की नसणे हा महत्वाचा विषय नाही. संघटनेत काही निर्णय होत असतात ते मान्य करायचे असतात. संघटना म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांनी काही उमेदवार जाहीर केले आहेत. आता राहिलेले उमेदवार लवकरच जाहीर करतील. विरोधकांकडून संपर्क सुरू आहेत. पण माझ्या मनात कोणताही संभ्रम नाही. चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळाली तरीही मी जोमाने काम करणार, असंही दानवे म्हणाले.
"मी शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा शिवसैनिक आहे, मी शिवसेनेचं काम करणार आहे. मी कुठेही जाणार नाही. विरोधकांना संभाजीनगरमध्ये उमेदवार भेटत नाही हे भाजपचे अपयश आहे. शिवसेनेचं मोठं यश आहे, मी चंद्रकांत खैरे एकत्र आहे, असंही अंबादास दानवे म्हणाले.