मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आमदार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोन दिवसात ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरुन ते नाराज झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. 'मी नाराज असल्याच्या चर्चांना काही अर्थ नाही, मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणारा शिवसैनिक आहे, असंही दानवेंनी स्पष्ट केलं. त्यानंतर, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही दानवेंच्या नाराजीवर भाष्य केलं आहे. दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत, ते नाराज नाहीत, असे राऊत यांनी म्हटले.
आगामी लोकसभा निवडणुकांची आजच घोषणा होत असून राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चितीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यानुसार, आता उमेदवारांची निवड करताना स्थानिक गटबाजी किंवा मतभेदांमुळे पक्षप्रमुखांची कसरत होत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जागा शिवसेनेची हक्काची जागा मानली जाते. त्यामुळे, येथील जागेवर उमेदवार ठरवताना चांगलंच मंथन होत आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे हे या जागेवरुन निवडणुकीसाठी आग्रही आहेत. तर, अंबादास दानवेंनीही इच्छा व्यक्त केली आहे. त्यावरुन, राजी-नाराजी असल्याचे चित्र आहे. याबाबत, आता संजय राऊत यांनी रात्रीच्या चर्चेची माहिती दिली.
''अजिबात नाहीत, ते विरोधी पक्षनेते आहेत, कटवट शिवसैनिक आहेत. काल संध्याकाळी उद्धव ठाकरे, मी, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे सर्वजण एकत्र होतो. त्यावेळी, छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवारीबाबत आमच्यात चर्चा झाली, आमच्यात एकमतही झालं. अंबादास दानवेही त्यावेळी चर्चेत सहभागी होते,'' असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच, आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा अंबादास यांनी बोलून दाखवली होती. पण, अंबादास दानवे कुठेही जाणार नाहीत, त्यांच्याबाबतच्या बातमच्या चुकीच्या आहेत, असे म्हणत राऊत यांनी अंबादास दानवेंबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
काय म्हणाले अंबादास दानवे
"मी नाराज असल्याच्या चर्चांना अर्थ नाही, मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणारा शिवसैनिक आहे. पक्ष प्रमुखांजवळ हट्ट करणे हा अधिकार आहे. आताच्या येणाऱ्या बातम्या या बदनामी करणाऱ्या आहेत. मी संघटनेच्या नेत्यांचा आदेश मानणारा नेता आहे.मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे, माझ्याकडे पक्षाने एवढी मोठी जबाबदारी दिली असताना मी नाराज होण, इकडे तिकडे जाणे या हवेतील गप्पा आहेत. मी मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे, माझी इच्छा मी लपवून ठेवलेली नाही. या मतदार संघात अजुनही साहेबांनी उमेदवार दिलेला नाही, असंही अंबादास दानवे म्हणाले.