अंबाजोगाईचा दिग्विजय आयपीएलमध्ये, मुंबई इंडियन्सने घेतले संघात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 07:36 AM2019-12-22T07:36:10+5:302019-12-22T07:36:34+5:30
संडे अँकर । मुंबई इंडियन्सने २० लाखांत घेतले संघात; अष्टपैलू कामगिरीने केले प्रभावित
औरंगाबाद : अंबाजोगाई येथे जन्म झालेला मराठवाड्याचा अष्टपैलू खेळाडू दिग्विजय देशमुख आता आयपीएलमध्ये आपला ठसा उमटवण्यास आतुर असणार. इंडियन प्रीमिअर लीगच्या तेराव्या हंगामात दिग्विजय देशमुख याचा कोलकाता येथे झालेल्या लिलाव प्रक्रियेत मुंबई इंडियन्स संघात समावेश करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये खेळणारा दिग्विजय देशमुख हा मराठवाड्याच्या भूमीतील तिसरा खेळाडू ठरेल. याआधी जालना येथील विजय झोल याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि अंकित बावणे याने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
गतवर्षी विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने लिलाव प्रक्रियेत आॅस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ख्रिस लिन याचा आपल्या संघात समावेश केला आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे जन्म झालेला अष्टपैलू खेळाडू दिग्विजय देशमुख याला २० लाख रुपयांची बोली लावताना मुंबई इंडियन्सने आपल्या संघात खेचले आहे. विशेष म्हणजे दिग्विजय देशमुख याने याच वर्षी महाराष्ट्र सिनिअर संघात पदार्पण केले. याच वर्षी त्याने सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत ७ लढतीत ९ बळी घेतले. पंजाबविरुद्ध ३४ धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने नुकतेच रणजी करंडक स्पर्धेतही पदार्पण करताना आपला ठसा उमटवला. पुणे येथे झालेल्या जम्मू-काश्मीरविरुद्धच्या रणजी करंडकाच्या लढतीत दिग्विजय देशमुख याने पदार्पण करताना एकूण सहा बळी घेतले. त्यात त्याने जम्मू-काश्मीरचे दुसºया डावात ४ फलंदाजांना ४६ धावांत तंबूत धाडले. तसेच फलंदाजीत दिग्गज फलंदाज तंबूत परतले असताना त्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येत ८३ धावांची जिगरबाज खेळी करीत ठसा उमटवला. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या सिनिअर स्पर्धेत तो पुणे येथील डेक्कन जिमखाना संघाचे प्रतिनिधित्व करतो. विशेष म्हणजे दिग्विजय देशमुख याने सुशांतसिंह राजपूत यांच्या काय पो छे या चित्रपटात छोट्या मुलाची भूमिकाही बजावली होती.