मुंबई : रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत आणि उद्योगपती विरेन मर्चंट यांची कन्या राधिका यांचा विवाहसोहळा १२ जुलै रोजी मुंबईत होणार आहे. त्यानंतर रविवारपर्यंत विविध कार्यक्रम होणार असून या सोहळ्याला जगभरातून पाहुणे येणार आहेत. त्यामुळे १२ ते १५ जुलैदरम्यान दुपारी १ ते मध्यरात्रीपर्यंत वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांवरील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार असल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
लक्ष्मी टॉवर जंक्शन येथून धीरुभाई अंबानी स्क्वेअर ॲव्हेन्यू लेन-३ मार्गे इंडियन ऑईल पेट्रोल पंप, डायमंड जंक्शन, हॉटेल ट्रायडंट, एमटीएनएल कुर्ल्याच्या दिशेने जाण्यास (कार्यक्रमाकरिता येणारी वाहने वगळता) वाहनांना प्रवेशबंदी असेल. वन बीकेसीकडून येणारी वाहतूक लक्ष्मी टॉवर जंक्शन येथून डावे वळण घेऊन पुढे जाईल. त्यानंतर डायमंड गेट नं. ८ समोरून नाबार्ड जंक्शन येथून उजव्या वळणानंतर डायमंड जंक्शन येथून पुन्हा उजवे वळण घेऊन धीरूभाई अंबानी स्क्वेअर/ इंडियन ऑईल पेट्रोल पंप येथून बीकेसी परिसरात मार्गस्थ होतील.
कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटिना जंक्शन, डायमंड जंक्शन आणि बीकेसीतील वाहनांना बीकेसी कनेक्टर ब्रिजच्या दिशेने जाण्यासाठी धीरूभाई अंबानी स्क्वेअर/इंडियन ऑईल पेट्रोलपंप येथून प्रवेशबंदी असेल. त्यामुळे वाहनांना पर्यायी मार्गाने कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटिना जंक्शन, डायमंड जंक्शन, नाबार्ड जंक्शन डावे वळण व डायमंड गेट नं. ८ समोरून लक्ष्मी टॉवर जंक्शन येथून बीकेसी परिसरात मार्गस्थ होता येईल.
भारतनगर, वन बीकेसी, दुई वर्क गोदरेज बीकेसीवरून (कार्यक्रमाकरिता येणारी वाहने वगळून) वाहनांना जिओ कन्व्हेन्शन सेंटर गेट क्र. २३ येथून जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, अमेरिकन वकालत, एमटीएनएल जंक्शनच्या दिशेने जाण्याकरिता प्रवेशबंदी राहणार आहे. पर्यायी कौटिल्य भवन उजवे वळण-पुढे ॲव्हेन्यू १ रोडने धीरूभाई अंबानी संकुल येथून इच्छितस्थळी मार्गस्थ होतील. एमटीएनएल जंक्शन येथून वाहनांना सिग्नेचर/सनटेक इमारत येथून अमेरिकन वकालत, जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी कनेक्टर ब्रिजव्या दिशेने जाण्यास बंदी असणार आहे.
वन वे वाहतूक
लतिका रोड हा अंबानी स्क्वेअर ते लक्ष्मी टॉवर जंक्शनपर्यंत वाहतुकीसाठी एक दिशा मार्ग करण्यात येणार आहे. ॲव्हेन्यू ३ रोड हा कौटिल्य भवन ते अमेरिकी वकालत जंक्शनपर्यंत वाहतुकीसाठी एक दिशा करण्यात येत आहे.