Join us

अंबानींनी अमेरिकेतील नदीकिनारी असलेला फ्लॅट विकला?, एवढ्या किंमतीत विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 9:51 AM

मुकेश अंबानींचे मुंबईतील जगप्रसिद्ध अँटिलिया हे निवासस्थान नेहमीच चर्चेत असते

मुंबई - जगभरातील श्रीमंतांच्या यादीत असलेले भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या खरेदीची नेहमीच चर्चा होत असते. अंबानींनी नवीन काही खरेदी केले किंवा नवीन काही सुरू केले की माध्यमांत त्याची चर्चा होत असते. नवीन घर असो किंवा नवी कार असो अंबानीचं म्हणजे लक्झरीयस असणारच. मात्र, यावेळी मुकेश अंबानींनी काही खरेदी केलं नसून विक्री केलं आहे. अंबानी यांनी त्यांचे न्यूयॉर्कमधील घर विकलं आहे. अमेरिकेन चलनानुसार ९ दशलक्ष डॉलरच्या किंमतीत हे घर विकण्यात आलं आहे. 

मुकेश अंबानींचे मुंबईतील जगप्रसिद्ध अँटिलिया हे निवासस्थान नेहमीच चर्चेत असते. मात्र, अमेरिकेतील त्याच्या अपार्टमेंटच्या विक्रीमुळे ते चर्चेत आहेत. न्यूयॉर्क पोस्टनुसार, मुकेश अंबानी यांनी मॅनहॅटनमधील त्यांच्या एका सुपर लक्झरी घराची विक्री केली आहे. न्यूयॉर्क स्थित मॅनहॅटनची निवासी मालमत्ता $९ दशलक्ष म्हणजे भारतीय चलनानुसार सुमारे ७४.५३ कोटी रुपयांना त्यांनी विकली आहे. दरम्यान, मुंबईसह लंडन, दुबई, न्यूयॉर्क येथे त्यांची स्वतःची घरं आहेत.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अंबानी कुटुंबाने लंडनमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. लंडनच्या स्टोक पार्कमध्ये त्यांनी ६०० कोटी रुपये खर्चून हे घर विकत घेतले. याशिवाय अंबानींचे दुबईत ६३९ कोटींचे घर आहे. तर, न्यूयॉर्कमधील २४८ खोल्यांच्या हॉटेलचेही ते मालक आहेत.

२४०६ स्वेअर फुटाचे अपार्टमेंट

न्यूयॉर्कमधील सुपीरियर इंक नावाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर त्याचा 2BHK फ्लॅट होता, जो त्याने आता विकला आहे. हिलरी स्वँक आणि मार्क जेकब्स सारख्या सेलिब्रिटी या १७ मजली इमारतीत त्यांचे शेजारी आहेत. अंबानी यांनी काही वर्षांपूर्वी ४०० W १२th Street येथे हे अपार्टमेंट विकत घेतले होते. २,४०६- स्क्वेअर-फूट अपार्टमेंटमध्ये हेरिंगबोन हार्डवेअर मजले, शेफचे स्वयंपाकघर आणि १० फूट उंच छत आहे. विशेष आकर्षण म्हणजे फ्लॅटचे दृश्य. वास्तविक अपार्टमेंट हडसन नदीजवळ बांधले आहे. त्यामुळे फ्लॅटच्या बाहेरील नदीचे दृश्य उत्तम आहे. ही इमारत २००९ मध्ये तयार करण्यात आली होती. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. मात्र, या वृत्ताला अंबानी कुटुंबाकडून दुजोरा मिळालेला नाही.