Join us

दादरमध्ये साकारणार आंबेडकर भवन

By admin | Published: April 11, 2016 2:49 AM

द पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’चे मार्गदर्शक रत्नाकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दादर येथे १७ मजली डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात येणार आहे

मुंबई : ‘द पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’चे मार्गदर्शक रत्नाकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दादर येथे १७ मजली डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात येणार आहे. या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार, १४ एप्रिल रोजी होणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सार्वजनिक सभागृहाची कल्पना १९३८ साली मांडली होती. ही कल्पना ‘द पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’च्या माध्यमातून साकार करण्यात येत आहे. मुंबईचे जागतिक स्तरावरील स्थान लक्षात घेऊन ‘द पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’तर्फे दादर येथे १७ मजली भव्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे भवन उभारण्यात येणार आहे.या नियोजित भवनामध्ये मानवाधिकार प्रशिक्षण आणि कार्यशाळा केंद्र, कायदा साहाय्य आणि कृती केंद्र, आर्थिक प्रगती आणि दस्तावेजकरण केंद्र्र, आंबेडकरी अर्थशास्त्राचे अभ्यास व संशोधन केंद्र, सामाजिक शास्त्र विषयक ज्ञानवर्धन, माहिती संकलन व संशोधन केंद्र, महिला उन्नती व सक्षमीकरण केंद्र, गुणवत्ता निर्मिती व वृद्धी मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र आहे. शिवाय आरोग्य सेवा प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन आणि कार्य दर्शविणारे उपयुक्त संग्रहालय, आधुनिक उपकरणांनी सुसज्ज ग्रंथालय, सामाजिक केंद्र, सांस्कृतिक सभागृह, कला दालन, विपश्यना केंद्र, अतिथीगृह, अल्पोपाहार केंद्र, मध्यवर्ती वातानुकूलन व्यवस्था, इमारत व्यवस्थापन सुविधा पद्धती (वायफाय, अग्निरोधक यंत्रणा) आणि प्रशिक्षित सुरक्षा व्यवस्था आदी बाबींचा यामध्ये समावेश असणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष योगेश वराडे, विश्वस्त विजय रणपिसे यांनी दिली.