आंबेडकर भवन अपूर्णच
By Admin | Published: December 6, 2014 12:45 AM2014-12-06T00:45:19+5:302014-12-06T00:45:19+5:30
ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे उद्घाटन ६ डिसेंबरला केले जाईल, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले होते.
नवी मुंबई : ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे उद्घाटन ६ डिसेंबरला केले जाईल, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले होते. परंतु अद्याप हे काम पूर्ण होऊ शकले नाही. कामामधील अडथळे दूर झाले असले तरी काम पूर्ण होण्यास किमान ३ महिने लागणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका ऐरोली सेक्टर १५ मध्ये ५७५० चौरस मीटर भूखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार करण्यासाठी १७ कोटी ४४ लाख रूपये खर्च करण्यात येणार आहेत. एप्रिल २०११ मध्ये या वास्तूचे बांधकाम सुरू करण्यात आले. ठेकेदारास दोन वर्षाची मुदत देण्यात आली होती. परंतु या स्मारकाच्या मार्गात आलेल्या अनेक अडथळ्यांमुळे काम वेळेत पूर्ण होवू शकले नाही. स्मारकामध्ये ५० मिटर उंचीचा डोम तयार केला जात आहे. डोम उभारण्याचे काम अत्यंत अवघड असल्याने काम धीम्या गतीने सुरू होते. आंबेडकर भवनच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. या स्मारकावरून विधानसभा निवडणुकीत राजकारणही चांगलेच तापले होते.
विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी आंबेडकर भवन स्मारकाच्या कामाची पाहणी करून प्रशासनाची झाडाझडती घेतली होती. ६ डिसेंबरला स्मारकाचे उद्घाटन केले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मंत्र्यांनी दिलेले आश्वासन शनिवारी संपत आहे. परंतु स्मारकाचे काम अद्याप अपूर्णच आहे. सद्यस्थितीमध्ये डोम उभारण्याचे सर्वात अवघड काम मार्गी लागले आहे. यामुळे पुढील तीन महिन्यात भव्य स्मारक तयार होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)