मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाने येत्या १८ फेब्रुवारी रोजी गेट वे आॅफ इंडिया येथे भव्य स्वरूपातील ‘आंबेडकरी जलसा’ आयोजित केला आहे. त्यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.आंबेडकरवादी कार्यकर्त्यांबरोबरच ज्यांना आंबेडकरी विचार लोककलांद्वारे समजून घ्यायचे आहेत, त्यांच्याकरिता ही प्रबोधनाची आणि रंजनाची अनोखी पर्वणी आहे. १८ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता आंबेडकरी नमनाने जलसा सुरू होईल. यात महाराष्ट्रातील आंबेडकरवादी ज्येष्ठ आणि लोकप्रिय कलाकार आपली कला सादर करतील. छत्तीसगढ येथील सुप्रसिद्ध कबीर गायक पद्मश्री पं. भारतीबंधू यांची ‘कबीरवाणी’ हे या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण असेल. आंबेडकरी नमन, कबीरवाणी, कीर्तन, बतावणी, भारूड, पोवाडा, गोंधळ, मूकनाट्य आणि बुद्धवंदना असे कलाप्रकार या भरगच्च कार्यक्रमात सादर होणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. (प्रतिनिधी)
गेट वे आॅफ इंडिया येथे रंगणार ‘आंबेडकरी जलसा’
By admin | Published: February 10, 2016 4:13 AM