आंबेडकर अनुयायांनी बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊ जाण्याची गरजेचे - डॉ. भालचंद्र मुणगेकर
By मनोहर कुंभेजकर | Published: April 16, 2024 08:02 PM2024-04-16T20:02:58+5:302024-04-16T20:04:09+5:30
अध्यक्षस्थानी केंद्राचे अध्यक्ष विजय जाधव होते.
मुंबई :-देशातील अर्थ व्यवस्था गंभीर असून भारताचे राजकारण, समाजकारण व अर्थकारण चिंताजनक असून वंचित, शोषित व दलित समाज यात टिकुन राहीला का? याचा गंभीरपणे विचार करण्याची आज गरज आहे. डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करतांना त्यांचे विचार अनुयायी म्हणून आपण पुढे नेले पाहिजे असे ठाम प्रतिपादनअर्थतज्ञ व नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले. ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राने आयोजिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 133 वी जयंती प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी केंद्राचे अध्यक्ष विजय जाधव होते.
डॉ. भालचंद्र मुणगेकर पुढे म्हणाले की, "देशात 90% लोक आजही खेडयात राहतात व त्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नसून जातीयतेमुळे ते अन्याय अत्याचार सहन करीत आहेत. देशातील सर्वच लोकांच्या हितासाठी, त्यांच्या अधिकारासाठी व त्यांच्या स्वातंत्र्यसाठी डॉ. बाबासाहेबांनी घटनेत तरतुद करून ठेवली आहे. परंतू, इतर नागरिक डॉ. बाबासाहेबांची जयंती उत्स्फुर्तपणे साजरी करत नाहीत ही शोकांतिका आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व सामाजिक न्याय यावर आधारलेली राज्यघटना संपूर्ण जगात श्रेष्ठ असून तिचे सर्वत्र कौतुक झाले आहे. परंतू दुर्देवाने या देशातील लोकांची मानसीकता आजही बदलेली नसून जातीयतेच्या नांवाखालील सर्वत्र भेदाभेद केली जात आहे. दलित स्त्रींकडे बघण्याची दृष्टी तर लांच्छनास्पद आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात तर गेल्या दहा वर्षात लाखो नागरिकांनी अन्याय सहन होत नाही म्हणून आत्महत्या केल्या तर कित्येकांना मारून टाकले आहे. जातीयता हा मोठा रोग आहे. त्यामुळे आपल्या लोकांनी सावध व एकजूटीने राहणे आवश्यक आहे. राजकारणात आता लाचारी सुरू झाली असून लाचारी करणारा नेता समाजाचे हित करू शकत नाही असे ते शेवटी म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी आपल्या भाषणात म्हणाले की, समता, स्वातंत्र्य व बंधुत्व ही जागतिक मुल्य आहेत व ती आबादीत राहण्यासाठी संघर्ष केला जातो. परंतू, आपल्या देशातील जागतिक मान्यता मिळालेल्या संविधानाची मोडतोड केली जाते हे बघून मन अस्वस्थ होते. यासाठी नागरिकांनी संविधान समजून घेतले पाहिजे व त्याप्रमाणे मानसिकता बदली पाहिजे. अत्यंत बुध्दीमान असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर खरे म्हणजे या देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे होते. असे झाले असते तर या देशाचा चेहरा मोहरा बदला असता. यावर चर्चा होण्याची आज गरज आहे.
या प्रसंगी उपस्थित असलेले विशेष पाहुणे व आंतरराष्ट्रीय आंबेडकरवादी मिशनचे अध्यक्ष हरबंस विर्दी म्हणाले की , डॉ. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे मी लंडनला गेलो व बाबासाहेबांची शिकवण व चळवळ तेथील लोकांना समजून सांगितली. लंडन मध्ये डॉ. बाबासाहेबांचा पुतळा, त्यांचा नावाचा हॉल, मुझियम, रस्त्याला नांव व बुध्द विहार बांधले आहे व या माध्यमातून लोकांमध्ये जागृती केली आहे. दरवर्षी डॉ. बाबासाहेबांची जयंती लंडन येथील सेंट्रल हॉल मध्ये मोठ्या प्रमाणात साजरी करतो. त्यांच्या कार्याची दाद उपस्थितांनी टाळ्या वाजवून दिली.
विजय जाधव म्हणाले की, संविधान व लोकशाही वाचविणेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. रात्र वै-याची आहे तेंव्हा जागृत रहा.सरचिटणीस
चंद्रकांत बच्छाव, उपाध्यक्ष नितिन सोनावणे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
या प्रसंगी उद्धव सेनेचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे उमेदवार अमोल कीर्तिकर, माजी नगरसेविका ज्योस्तना दिघे,उपविभागप्रमुख राजेश शेट्ये,माजी नगरसेवक संजय पवार, महाराष्ट्र चर्मकार समाजाचे पदाधिकारी राजू नेटके व सरोज बिसुरे, अँड. राजेश खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्त्या
मेघना माने आदी मान्यवर व विश्वस्त उपस्थित होते.