Join us

अंबरनाथ आर्ट फेस्टिव्हलची दिमाखदार सुरुवात

By admin | Published: May 05, 2017 3:46 PM

मुंबईसह अवघ्या अंबरनाथ शहराचे लक्ष लागून राहिलेल्या अंबरनाथ आर्ट फेस्टिव्हलची आज शिवाजी चौक ते शिवमंदिर अशा दिमाखदार दिंडी मिरवणुकीने शुक्रवारी जल्लोषात सुरूवात

ऑनलाइन लोकमत

अंबरनाथ, दि. 05 - मुंबईसह अवघ्या अंबरनाथ शहराचे लक्ष लागून राहिलेल्या अंबरनाथ आर्ट फेस्टिव्हलची आज शिवाजी चौक ते शिवमंदिर अशा दिमाखदार दिंडी मिरवणुकीने शुक्रवारी जल्लोषात सुरूवात झाली. या मिरवणुकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर, नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 
कल्याण येथील बसरीवाला ढोल ताशा पथक आणि डोंबिवलीचे आदिशक्ती महिला ढोलताशा पथक यांनी अंबरनाथचे रस्ते दणाणून सोडले. आदिवासींचे पारंपरिक नृत्य आणि वारकऱ्यांच्या ग्यानबा तुकारामच्या गजराने या दिंडी सोहळ्याला आगळी रंगत आणली. फेटे घातलेल्या मराठमोळ्या तरुण तरुणी आणि शिवसैनिक कार्यकर्त्यांच्या जल्लोशपूर्ण जथ्यांनी या मिरवणुकीला मराठमोळ्या शोभायात्रेचे स्वरूप आले होते.  जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी अवघा अंबरनाथ परिसर दुमदुमला होता. जागोजागी सेल्फी काढणारी तरुणाई आणि या अनोख्या जोशपूर्ण दिंडीला कॅमेऱ्यात चित्रबद्ध करण्यासाठी धडपडणारे आबालवृद्ध अंबरनाथकर असे चित्र जागोजागी दिसत होते.
गेल्या फेस्टिव्हलच्या तुलनेत हा फेस्टिव्हल अधिक भव्य दिव्य प्रकारे साजरा होणार असल्याची नांदीच या दिमाखदार दिंडी सोहळ्याने अंबरनाथकरांना दिली. अंबरनाथ आर्ट फेस्टिव्हला पारंपरिक साज चढवत आज जल्लोषपूर्ण वातावरणात सुरुवात झाली असून या तीन  दिवसात कला, संगीत, खाद्य यांची मेजवानी अंबरनाथकरांना मिळणार आहे. अंबरनाथच्या शिवमंदिरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जलाभिषेक करून या दिंडीची सांगता झाली. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदा देखील वरुण राजाने कृपा करावी, असे साकडे यावेळी महादेवाला घालण्यात आले.