अंबरनाथ : अंबरनाथ ते बदलापूरमार्गे पुण्याला जोडणारा राज्य महामार्ग १०० फूट करण्याचा प्रस्ताव मंजूर होता. मात्र, या रस्त्याच्या आड अनधिकृत व्यापारी गाळे आड येत असल्याने त्याचे रुंदीकरण थांबवले होते. त्याचा आढावा घेण्यासाठी आ. किसन कथोरे यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा मार्ग १०० फुटी करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच रुंदीकरणाचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सोडविणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. कल्याण-अंबरनाथ-बदलापूरमार्गे पुण्याला जोडणाऱ्या राज्य महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून अंबरनाथ परिसरात सुरू आहे. साईबाबा मंदिर ते आयटीआयपर्यंतचा रस्ता नियमाप्रमाणे १०० फूट केला आहे. मात्र, आयटीआय ते फॉरेस्ट नाक्यापर्यंतचा रस्ता हा दोन्ही बाजूंनी अनधिकृत बांधकामांनी व्यापला आहे. १ हजार ३०० व्यापारी गाळे आणि काही घरांना नोटीस काढून ही अनधिकृत बांधकामे हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. यात राजकीय हस्तक्षेप झाल्याने हे काम रखडलेल्या अवस्थेत राहिले. व्यापाऱ्यांनी आपली अनधिकृत बांधकामे वाचविण्यासाठी तत्कालीन पालकमंत्र्यांकडे दाद मागितली. पालकमंत्र्यांनीही समस्या न सोडविता तोंडी स्थगिती आदेश देऊन रुंदीकरण थांबविले होते. निवडणुकीच्या तोंडावर या रस्त्याचा विषय पुन्हा चर्चेत आला होता. चौपदरी रस्त्यापैकी तीनपदरी रस्त्याचे काम झाले आहे. एका लेनचे काम अजूनही शिल्लक आहे. अनधिकृत गाळे तोडून रुंदीकरण न झाल्याने हा रस्ता अर्धवट राहिला आहे. त्यामुळे कथोरे यांनी बैठक घेऊन हे आदेश दिले़ (प्रतिनिधी)
अंबरनाथ-बदलापूर रस्ता १०० फुटीच
By admin | Published: November 19, 2014 12:42 AM