Join us

अंबरनाथ,बदलापूरात मतांचा बाजार

By admin | Published: April 03, 2015 10:46 PM

२२ एप्रिल रोजी निवडणूक होणार असल्याने आता उमेदवार आपले मतदान निश्चित करण्याच्या मागे लागले आहेत. पूर्वी झोपडपट्यांत पैशांच्या जोरावर

पंकज पाटील, अंबरनाथ२२ एप्रिल रोजी निवडणूक होणार असल्याने आता उमेदवार आपले मतदान निश्चित करण्याच्या मागे लागले आहेत. पूर्वी झोपडपट्यांत पैशांच्या जोरावर मते वळवली जात होती. आता इमारतीत राहणाऱ्या सुशिक्षित व्यक्ती देखील मतांच्या बाजारात सामिल झाले आहेत. मताच्या मोबदल्यात राहत असलेल्या इमारतीमध्ये उमेदवाराकडून खाजगी कामे करुन घेत आहेत. सोसायटीत राहणा-यांच्या मागण्याची हाव पाहता आता उमेदवारांना सोसायट्यांपेक्षा झोपडपट्टीत राहणा-यांची मते परवडत आहेत. पालिकेची निवडणूक ही प्रभावनिहाय असल्याने ३ ते ४ हजार मतदारांच्या या प्रभागात मतदारांना आर्थिक आमिष देऊन त्यांची मते वळविण्याकडे उमेदवारांचा कल जास्त आहे. पालिका निवडणूकीत ‘पैसा द्या मते घ्या’ अशी स्थितीच असल्याने उमेदवार विविध आमिषे देऊन मतदारांना आकर्षित करित आहेत. झोपडपट्टी किंवा चाळीत राहणा-यांना आर्थिक ताकदीवरच आपल्याकडे वळविण्याचा कल जास्त असतो. तर सुशिक्षित मतदार उमेदवार पाहुन मत देणार ही अपेक्षा असल्याने या मतदारांची भेट घेऊन त्यांना आवाहन करण्यापलीकडे कोणताच मार्ग राहत नव्हता. मात्र आता ही स्थिती बदलली असून आता प्रत्येक सोसायटीनुसार उमेदवार तीमधील संपूर्ण मते आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करित आहेत. प्रत्येक सोसायटी आपल्या प्रभागातील उमेदवाराकडून काय मागायचे यासाठी खाजगी बैठक घेत आहेत. काही सोसायटी इमारतीत बोअरवेल तर काही सोसायटी इमारतीला कॉलम मारुन घेत आहेत. काही जण इमारतीच्या आवारात पेव्हर ब्लॉक तर काही जण टाईल्स बसविण्याची मागणी करित आहे. या पुढे जाऊन आता अंबरनाथ आणि बदलापूरात इमारतीच्या आवारात सीसीटीव्ही कॅमरे बसविण्याची आणि इमारच्या टेरेसवर पत्रे बसविण्याची मागणी जोर धरत आहे. इमारतीच्या सुरक्षेच्या हेतूने कॅमेरे लावल्यास ते कायमस्वरुपी राहतील ही अपेक्षा असल्याने उमेदवार देखील ते काम करुन देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. सोसायटीमधील मतदारांच्या खर्चीक मागण्या पाहता उमेदवारांना झोपडपट्टीतील मतदार प्रिय (स्वस्त ) वाटत आहेत.