Join us  

अंबरनाथ, बदलापुरात जल्लोष

By admin | Published: April 23, 2015 10:54 PM

येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने वर्चस्व निर्माण करून सत्तेकडे वाटचाल केलेली आहे. शिवसैनिकांनी केलेल्या फटाक्यांची आतषबाजी अन् गुलालाची

अंबरनाथ/बदलापूर : येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने वर्चस्व निर्माण करून सत्तेकडे वाटचाल केलेली आहे. शिवसैनिकांनी केलेल्या फटाक्यांची आतषबाजी अन् गुलालाची उधळण यामुळे शहरातील सर्व रस्ते अक्षरश: न्हाऊन निघाले. एकहाती आलेल्या सत्तेमुळे शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावला. या जल्लोषामध्ये महिला आघाडीचा उत्साह विशेष होता.अंबरनाथ येथे सेनेला पुन्हा सत्ता मिळाल्याचा तर स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेस आणि भाजपाला नगरसेवक वाढल्याचा आनंद झाला आहे. जागा घटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेवर आत्मचिंतन करण्याची पाळी आली आहे. त्यातच प्रभाव असलेल्या रिपाइं सेक्युलरला राष्ट्रवादीच्या चिन्हावर अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. गेल्या पालिका निवडणुकीत ५० पैकी शिवसेना १६, रिपाइं सेक्युलर ९, राष्ट्रवादी ८, मनसे ६, काँग्रेस ३, भाजपा १ आणि अपक्ष ७ असा आकडा होता. या निवडणुकीत ५७ जागांपैकी २६ जागांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. तर, रिपाइंचा आकडा ९ वरून २ वर आला आहे. राष्ट्रवादीचा आकडा ८ वरून ३ वर घसरला, तर मनसे ६ वरून २ वर गडगडला. भाजपाच्या पदरी एका जागेवरून १० जागा पडल्या आहेत. तर स्वबळावर निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेसने ३ वरून ८ जागा जिंकल्या आहेत. त्यातही दोन जागांवर त्यांचे उमेदवार अल्प मतांनी पराभूत झाले. कुळगाव - बदलापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकहाती सत्ता खेचून आणण्यात शिवसेनेला यश आले आहे. भाजपानेदेखील जोरदार मुसंडी मारून २० जागा पटकावल्या आहेत. राष्ट्रवादीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले असून एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. काँग्रेस आणि मनसेला भोपळाही फोडता आलेला नाही. ४७ सदस्य असलेल्या पालिकेत २४ जागा जिंकून शिवसेनेने सत्ता कायम राखली आहे. विजयानंतर बदलापुरात शिवसेनेचा जल्लोष आहे. पश्चिमेकडील भागात भाजपाने जोरदार मुसंडी मारल्यावर कात्रप, शिरगाव, गांधी चौक, बेलवली, बदलापूर गाव, रमेशवाडी येथून शिवसेनेचे उमेदवार एकगठ्ठा निवडून आल्याने पहिल्यांदाच दोन फेऱ्यांमध्ये आघाडीवर असलेल्या भाजपाला २० जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे हेच आता नगराध्यक्षपदाचे मुख्य दावेदार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे गटनेते व शिवसेनेत गेलेले राजेंद्र चव्हाण यांचा पराभव नवख्या किरण भोईर यांनी केला. राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आणि शेवटच्या क्षणी शिवसेनेतून निवडणूक लढविणारे मिथुन कोशिंबे यांचा पराभव हेमंत चतुरे यांनी केला.