पोलिसांची खासगी कार बनली रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 01:29 AM2020-06-02T01:29:43+5:302020-06-02T01:30:38+5:30
आता २४ तास कार्यरत राहावे लागणार म्हणून सोनावणे यांनी, मुलींना आणि पत्नीला आपल्यामुळे बाधा नको म्हणून गावी नंदुरबारला सोडण्याचे ठरविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत रुग्णवाहिकेचा तुटवडा असताना, मुंबईतील पोलीस शिपायाने खासगी कारचे रुग्णवाहिकेमध्ये रूपांतर केले आहे. विशेषत: झोपडपट्टी भागातील कोरोनाबाधित रुग्णांना मदत लागल्यास त्यांची ही रुग्णवाहिका २४ तास कार्यरत असते.
कुलाबा परिसरात राहणारे तेजस सोनावणे (३४) कफ परेड पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. पत्नी आणि दोन मुली (८ आणि ५ वर्षांची) असे त्यांचे कुटुंब. कर्तव्य बजावत असताना, रुग्णवाहिकेसाठी रहिवाशांची होणारी वणवण त्यांनी जवळून अनुभवली. अनेकदा मित्रांकडून खासगी कारमधून राहिवाशांना रुग्णालयापर्यंत नेण्याची धडपड सुरू होती. मात्र असे किती दिवस करणार म्हणून त्यांनी मित्रांकडे कोरोनाच्या संकटात वाहनाची मदत मागितली. अखेर, संतोष पांडे आणि माजिद शेख या मित्रांनी त्यांचे वाहन सोनावणेंना दिले. या कारचे सुरेश माळी या मित्राने रुग्णवाहिकेत रूपांतर केले.
आता २४ तास कार्यरत राहावे लागणार म्हणून सोनावणे यांनी, मुलींना आणि पत्नीला आपल्यामुळे बाधा नको म्हणून गावी नंदुरबारला सोडण्याचे ठरविले. पत्नीने या कठीण प्रसंगात सोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याने, मुलींना ते गावी सोडून आले. गेल्या आठवड्यापासून त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोफत सेवा सुरू केली. यात पेट्रोल, गॅसचा खर्च ते स्वत:च्या खिशातून करत आहेत. ड्युटीनंतरही कुणाचा कॉल येताच ते तात्काळ रुग्णवाहिकेवर हजर होत आहेत. पोलीस ठाण्याबाहेर ही रुग्णवाहिका तैनात असते. त्यामुळे कुणाला गरज भासल्यास ते पोलीस ठाण्याशी संपर्क साधतात. त्यानुसार, सोनावणे आपले कर्तव्य बजावत आहे.