राज्यासह मुंबईत रुग्णवाहिकांच्या नोंदणीत 30 टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 04:36 AM2021-04-04T04:36:28+5:302021-04-04T04:36:49+5:30

राज्यात रुग्णवाहिकांची संख्याही २५.७१ टक्क्यांनी वाढली

Ambulance registration in Mumbai, including the state, increased by 30 per cent | राज्यासह मुंबईत रुग्णवाहिकांच्या नोंदणीत 30 टक्क्यांनी वाढ

राज्यासह मुंबईत रुग्णवाहिकांच्या नोंदणीत 30 टक्क्यांनी वाढ

Next

मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. परिणामी, दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत असून त्याचाच भाग म्हणून मागील काही दिवसांत राज्यासह मुंबईत रुग्णवाहिकांच्या नोंदणीत ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे, राज्यातील रुग्णवाहिकांच्या संख्येतही भर पडून याचे प्रमाण २५.७१ टक्क्यांनी वाढले आहे.

कोरोनामुळे मागील वर्षीही राज्यातील आराेग्य यंत्रणा अहोरात्र व्यस्त असलेली दिसून आली. राज्यात जीवनदायिनी म्हणून नावारूपास आलेली १०८ रुग्णवाहिका काेरोना रुग्णांना सेवा देत आहे. राज्यात १०८ या क्रमांकाच्या ९३७ रुग्णवाहिका आहेत. त्यात काेरोनाग्रस्त रुग्णांना सेवा देण्यासाठी ३१८ रुग्णवाहिकांचा वापर होत आहे. यातील ९३ रुग्णवाहिका मुंबईच्या सेवेत आहेत.

महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसने दिलेल्या माहितीनुसार, २०१४ पासून २४ मार्चपर्यंत राज्यात ४ लाख ६० हजार ९१०, तर मुंबईतील ३९,६०० कोरोना रुग्णांना सेवा देण्यात आली. २०१४ सालापासून २४ मार्चपर्यंत राज्यात आपत्कालीन सेवेसासाठी ५०,२१४ रुग्णांना सेवा दिली आहे. मुंबईत १०८ रुग्णवाहिकेच्या आपत्कालीन सेवेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३ लाख ४२ हजार २४५ आहे.

याविषयी, अधिक माहिती देताना महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस प्रमुख कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी सांगितले, राज्यात गेल्या वर्षी कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळात रुग्णवाहिकांची गरज वाढली होती. त्यानंतर हळूहळू हे प्रमाण कमी होत गेले, मात्र आता कोरोना रुग्ण वाढत असल्याने रुग्णवाहिका मागणीचे प्रमाण सुमारे ३० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे.

रुग्णवाहिकांची संख्याही वाढली
राज्यात २०१९ साली १५ हजार ८५० रुग्णवाहिकांची नोंदणी करण्यात आली होती. हे प्रमाण ९.५२ टक्क्यांनी वाढून राज्यात २०२० साली १६ हजार ७७० रुग्णवाहिकांची नोंद करण्यात आली. तर नव्या वर्षात २०२१ मध्ये यात आणखी वाढ झाली असून ही संख्या आता १७ हजार ३६० वर गेली आहे. 
मुंबईत २०१९ साली १ हजार ४०० रुग्णवाहिका होत्या, २०२० साली हे प्रमाण १ हजार ५७० वर गेले. तर २०२१ मध्ये हे प्रमाण वाढून १ हजार ७६० वर गेले आहे.

आकडेवारी
१०८ च्या ९३ रुग्णवाहिकांनी दिली सेवा
मुंबई     कोरोना रुग्ण    नाॅनकोविड रुग्ण
जानेवारी २०२१     ९००     ४,५०६
फेब्रुवारी २०२१     १,४६७     ११,२२१
२४ मार्चपर्यंत     ३,००१     ६,०३५
एकूण     ५,३६८     २१,७६२

Web Title: Ambulance registration in Mumbai, including the state, increased by 30 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.