Join us

रुग्णवाहिकेची सेवा एका क्लिकवर !

By admin | Updated: June 6, 2017 02:17 IST

माहिती तंत्रज्ञानाच्या विस्ताराने सुलभ झाल्याने आता विविध क्षेत्रांत योग्य वापर करण्यासाठी तरुणाई धडपडते आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या विस्ताराने सुलभ झाल्याने आता विविध क्षेत्रांत योग्य वापर करण्यासाठी तरुणाई धडपडते आहे. याच प्रयत्नातून तरुणांनी एकत्र येत रुग्णवाहिकेची सेवा एका क्लिकवर देण्यास सुरुवात केली आहे. ‘अ‍ॅम्ब्युलन्स डॉट रन’ या अ‍ॅपच्या माध्यमातून सामान्यांना ही सेवा मिळणार आहे.या अ‍ॅपच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत मोबाईलच्या सहाय्याने कमी वेळात नजीकच्या परिसरातील रुग्णवाहिका सहज उपलब्ध होणार आहे. जवळच्या परिसरातील रुग्णवाहिका शोधण्यासाठी आणि ती रुग्णवाहिका बुक करण्यासाठी हे अ‍ॅप मदत करणार आहे. सध्या ही सेवा मुंबई, पुणे आणि ठाण्यात सुरु करण्यात आली आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून बुकींग करताना त्या व्यक्तीचे स्थळनिश्चिती अ‍ॅपमध्ये अंतर्भूत होईल. त्यानंतर बुकींगची प्रक्रिया पूर्ण होईल. या अ‍ॅपला ३६० हून अधिक रुग्णवाहिका आणि २५० हून अधिक रुग्णवाहिकांचे आॅपरेटर्स जोडले आहेत, अशी माहिती अ‍ॅम्ब्युलन्स डॉट रनचे संचालक हेमंत ठाकरे यांनी दिली. रुग्णवाहिकेच्या या सेवेचा आरंभ नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. अ‍ॅपविषयी बोलताना हेमंत ठाकरे यांनी सांगितले की, बऱ्याचदा आपल्या येथील रुग्णवाहिकेची सेवा पुरविण्यात काही त्रुटी आढळतात. त्या त्रुटी भरुन काढण्यासाठी आणि सामान्यांना रुग्णवाहिकेची सेवा तातडीने सहज उपलब्ध करुन देण्यासाठी या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली असून भविष्यात सेवेचा विस्तार करण्यात येईल.