लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहरातील रुग्णवाहिकांच्या सायरनचा आवाज, जगातील रुग्णवाहिकांच्या सायरनच्या तुलनेत सर्वात जास्त असल्याचे मत ‘आवाज फाउंडेशन’ने नोंदविले आहे. शहरातील सर्वच रुग्णवाहिकांच्या सायरनचा आवाज जवळपास शंभर डेसिबल असल्याचे, संस्थेने केलेल्या सर्वेक्षणावरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, रुग्णवाहिकांच्या सायरनचा आवाज रुग्णालयाच्या आवारातही तितकाच असतो. यामध्ये प्रामुख्याने हिंदुजा रुग्णालयाच्या परिसरात सायरनचे सर्वात जास्त ध्वनिप्रदूषण होत असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले असून, याची नोंद १००.५ डेसिबल एवढी आहे.जगभरातील इतर मोठ्या शहरांमध्ये रुग्णवाहिकांच्या सायरनचा आवाज मर्यादित राहील, याची काळजी घेतली जाते. रुग्णालयाच्या आवारात ७५ डेसिबलपेक्षा अधिक ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घेतली जाते. याउलट मुंबईतील रुग्णवाहिकांच्या सायरनचा आवाज ९० डेसिबलपेक्षा जास्त असतो. त्यात अधिक भर म्हणून रस्त्यावरील इतर वाहनांच्या हॉर्न आणि इंजिनचा आवाज यांचा समावेश आहे. आवाजामुळे रुग्णवाहिकेमधील डॉक्टर आणि परिचारिका त्यांचे काम नीटपणे करू शकत नाहीत. जर रुग्णवाहिकेमध्ये हृदयरोगाचा रुग्ण असेल, तर ते त्याच्या जिवाला धोकादायक आहे, असे ‘आवाज’चे म्हणणे आहे.शहरातील रुग्णवाहिकांच्या सायरनाचा आवाज १२० डेसिबल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. असे झाल्यास रुग्णवाहिकेमधील डॉक्टर आणि परिचारिका त्यांचे काम करू शकणार नाहीत, असे आवाज फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुल अली यांनी सांगितले.
रुग्णवाहिकेचा ‘आवाज’ रुग्णांसाठी ‘ताप’दायक
By admin | Published: July 08, 2017 6:19 AM