Join us

ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या प्रत्येक वाहनाला रुग्णवाहिकेचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:07 AM

टोल नाक्यांवर थांबविले जाणार नाही; टोल आकारला जाणार नाहीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आजघडीला कोरोनाचा संसर्ग अनेक ठिकाणी ...

टोल नाक्यांवर थांबविले जाणार नाही; टोल आकारला जाणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आजघडीला कोरोनाचा संसर्ग अनेक ठिकाणी वाढत असून, ऑक्सिजनची कमतरताही भासत आहे. परिणामी विविध वाहनांच्या माध्यमातून ऑक्सिजन वाहून नेला जात आहे. मात्र ऑक्सिजन वाहून नेताना त्या वाहनास टोलनाक्यांसह कुठेही अडविण्यात येऊ नये. त्या वाहनास टोल आकारला जाणार नाही, अशा आशयाचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील सर्व टोलनाक्यांना हे निर्देश लागू आहेत. सदर वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे. त्या वेगाने त्यांना सोडले पाहिजे. एका अर्थाने जिथे जिथे ऑक्सिजनची गरज आहे आणि जिथे जिथे ज्या ज्या वाहनांतून ऑक्सिजन वाहून नेला जाईल त्या वाहनाला टोलनाक्यावर अडविण्यात येऊ नये. महामार्गावरून ही वाहने जातील तेव्हा टोलनाक्यांवर त्यांना थांबविण्यात येऊ नये. यात टँकर किंवा सिलिंडर वाहून नेत असलेल्या वाहनांचादेखील समावेश आहे. या सगळ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा आहे. त्यांना वेगाने सोडावे. कोणत्याही प्लाझावरून याबाबतचे वाहन विनाअडथळा पास व्हावे; असे निर्देश देण्यात आले आहेत. जिथे ऑक्सिजन घेऊन जात आहे त्या वाहनास टोल आकारला जाणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टोल विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक कमलाकर फंड यांनी दिली.

* राज्याच्या सीमेवरही हे निर्देश लागू

मोठे टँकर हे २० टन किंवा पंधरा टनाचे असतात. त्यांना अनेक वेळ महामार्गावर थांबविले जाते. मात्र रुग्णवाहिकेला ज्याप्रमाणे थांबविले जात नाही त्याप्रमाणे या वाहनांही थांबवू नये. तातडीने ऑक्सिजन वाहून नेता यावा म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत. राज्याच्या सीमेवरही हे निर्देश लागू होतील. कारण राज्याबाहेरूनदेखील ऑक्सिजन मागविला जात आहे.