वाहतूककोंडी अडवतेय रुग्णवाहिकेची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:06 AM2021-01-23T04:06:42+5:302021-01-23T04:06:42+5:30
पार्किंगसह, विकासकामांचा अडथळा : सात किमीचे अंतरासाठी लागली ३५ मिनिटे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शताब्दी रुग्णालय ते सायन ...
पार्किंगसह, विकासकामांचा अडथळा : सात किमीचे अंतरासाठी लागली ३५ मिनिटे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शताब्दी रुग्णालय ते सायन रुग्णालय सात किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी शुक्रवारी एका रुग्णवाहिकेला ३५ मिनिटांचा कालावधी लागला. शहरातील वाहतूक काेंडीतून रस्ता मिळतो, पण रस्ते दुरुस्ती कामे यामुळे रुग्णवाहिकेला जाण्यास अडथळा येत आहे.
अपघातातील जखमी असो किंवा प्रकृती अत्यवस्थ असलेला रुग्ण असो या रुग्णाला सायन रुग्णालयात नेताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. रुग्णांसाठी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. परंतु, अनेक वाहनचालक रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ता देतात. मात्र मैत्री पार्क भागात रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीचा चांगलाच खोळंबा होत आहे. तसेच सायन ट्रॉम्बे मार्गावरून सायनला जाताना पांजरापोळ सिग्नल ,चेंबूरनाका सिग्नल आणि सुमननगरपर्यंत काही प्रमाणात वाहतूककोंडी होते. तसेच अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अनेकदा रुग्णवाहिका वाहतूक कोंडी अडकल्याचे चित्र दिसते.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. पण रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज ऐकून वाहनचालक रस्ता मोकळा करून देतात.
- प्रवीण पडवळ, अतिरिक्त पोलीस आयुक्त
रुग्णाला वेळेत रुग्णालयात दाखल केले तर त्याचे प्राण वाचतात. परंतु, अनेकवेळा रुग्णवाहिका चालविताना शहरातील वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामध्ये मेट्रो आणि इतर कामे सुरू असल्याने रस्त्याचा कमी भाग वाहतुकीला मिळतो. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. सिग्नलजवळ गाडी असेल तर लवकर रस्ता मिळतो पण पूर्ण रस्ता ब्लॉक असेल तर वेळ लागतो.
बाळू गडदे, रुग्णवाहिकाचालक
वाहनचालकांचा गैरसमज
रुग्णवाहिका सुरू असताना सायरनचा आवाज ऐकून अनेक वाहनचालक रस्ता मोकळा करतात. पण काही चालक रुग्ण नसेल तरी सायरन वाजवला जातो असे समजून जागा देत नाहीत. मात्र रुग्ण असेल तर सायरन वाजवला जातो. तेव्हा १५ ते ४५ मिनिटे रुग्णालयात पोहोचण्यास लागतात. मात्र रुग्ण नसेल सायरन वाजवला जात नाही त्यामुळे सायन रुग्णालयातून परत येताना एक तासाहून अधिक वेळ लागतो, असे एका रुग्णवाहिका चालकाने सांगितले.
ना कोणाला आर्थिक दंड, ना कोणाला शिक्षा
रुग्णवाहिका किंवा इतर कोणतेही आपत्कालीन वाहन अडविले तर दहा हजार रुपये दंड किंवा तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. रुग्णवाहिका येताच तिला वाट मोकळी करून द्यावी, अशा सूचना वेळोवेळी प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. परंतु, वाहतूक कोंडीत ब्रेक मारतच रुग्णवाहिकेच्या चालकांना वाट काढावी लागते. वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाते. परंतु, रुग्णवाहिकेला अडथळा करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई झालेली नाही.