- मनोज मोघेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती, साथरोग यासारख्या आपत्तींत आरोग्य विभागाकडून आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविली जाते. राज्यात सध्या १०८ ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून ही रुग्णसेवा पुरविली जात असतानाच त्या ताफ्यात आता आणखी १५२९ रुग्णवाहिकांची भर पडणार आहे. यामध्ये ॲडव्हान्स आणि बेसिक लाइफ सपोर्टिंग रुग्णवाहिकांबरोबरच मोटारबाईक आणि बोट रुग्णवाहिकांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे आपत्कालीन वैद्यकीय सेवा सक्षम होणार आहेत.
राज्य आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत या ॲम्बुलन्स घेण्यात येणार असून यासाठी सरकारी व खासगी भागीदारीतून १० वर्षांसाठी पुरवठादाराची नेमणूक करण्यात येणार आहे. ई मार्केटप्लेस पोर्टलच्या माध्यमातून यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून यासाठी ७५९ कोटी ५६ लाख ५१ हजार १९० रुपयांच्या खर्चासही मान्यता दिली.
राज्यपालांनी व्यक्त केली होती चिंता nराज्यपाल रमेश बैस यांनी दुर्गम भागांत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होत नसल्याबाबत खंत व्यक्त केली होती. त्याची तत्काळ दखल घेत राज्यातील ॲम्ब्युलन्स सेवा सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. nविशेषत: दुर्गम ग्रामीण भागांत गर्भवती महिला, हृदयविकार रुग्ण यांना तातडीची सेवा पुरविण्यासाठी ॲडव्हान लाइफ सपोर्टिंग रुग्णवाहिका पुरविण्यावर भर देण्यात येणार आहे. nशहरी आणि दाटीवाटीच्या भागात पोहोचण्यासाठी मोटारबाईक ॲम्ब्युलन्स तसेच समुद्रातील आपत्तींस्थळीही पोहोचता यावे यासाठी बोट ॲम्ब्युलन्सचाही समावेश करण्यात आला आहे.निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यास उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करून या रुग्णवाहिका खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
किती रुग्णांना मिळाला ‘१०८’चा लाभ?n२०१४ ते २०२३ या कालावधीत ८६ लाख ५२ हजार १८१ नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेचा लाभ घेतला आहे. सध्या १०८ च्या ९३७ रुग्णवाहिका आहेत. nदहा वर्षांच्या काळात १०८ रुग्णवाहिकेत ४० हजार बालकांचा जन्म झाला आहे. २०१८ मध्ये सर्वाधिक ११,१४१ बालकांचा जन्म झाला. २०२२ मध्ये ही संख्या १,१९७ इतकी नोंदवली. nजानेवारी ते डिसेंबर २०२२ दरम्यान महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागाच्या ‘१०८’ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांनी राज्यातील १४ लाखांहून अधिक रुग्णांना वैद्यकीय मदत दिली आहे.