Join us

रुग्णवाहिकांनी चार महिन्यांत दिली 8 हजार बाधितांना सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 7:29 AM

मुंबई शहर, उपनगरात ४० टक्क्यांनी मागणीत झाली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  मुंबईसह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कायम आहे. परिणामी, मागील काही दिवसांत मुंबईत रुग्णवाहिकांकडे रुग्णसेवेसाठीची मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. शहर, उपनगरात आतापर्यंत या सेवेसाठीच्या मागणीत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या १०८ रुग्णवाहिकेने मागील चार महिन्यांच्या काळात ८ हजार २०८ कोरोना रुग्णांना सेवा दिली आहे, तर २४ हजार ५८८ नाॅनकोविड रुग्णांना सेवा दिली आहे.फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून, पूर्वीपेक्षा अधिक झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. काेरोनाची बाधा झाल्याचा निरोप मिळाल्यानंतर रुग्णाला त्याच्या घरून रुग्णवाहिकेने रुग्णालय किंवा काेरोना केंद्रात घेऊन जाण्यात येते; परंतु रुग्णवाहिकेसाठी आता रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. एका रुग्णाला रुग्णवाहिकेतून रुग्णालय अथवा कोरोना केंद्रात सोडल्यानंतर ती निर्जंतुक करावी लागते. त्यानंतरच दुसऱ्या रुग्णाला रुग्णवाहिकेतून घेऊन जाण्यात येते.शहर, उपनगरात १०८ क्रमांकाच्या ४२, पालिकेच्या ४८, बेस्ट बस ३१ एमएसआरटीसीच्या तीन बस, अशा एकूण ४४७ रुग्णवाहिका सध्या काेरोनाबाधितांच्या सेवेत आहेत. एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात पालिकेकडे २९१ रुग्णवाहिका होत्या. रुग्णसंख्या वाढल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात १० एप्रिल १५६ रुग्णवाहिका वाढविण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.१०८ रुग्णवाहिका सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी सांगितले की, मागील काही दिवसांत राज्यातील ग्रामीण भागात रुग्णवाहिका सेवेची मागणी प्रचंड वाढली आहे. प्रमुख शहरातही रुग्णवाहिका सेवेच्या मागणीत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोविड किंवा नाॅनकोविड अशा दोन्ही रुग्णांना सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या