मुंबई : गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास चालढकल करतानाच, दिलेला शब्द पाळण्यात उशीर करणारे सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्या लोणावळा येथील ‘अॅम्बी व्हॅली’ची लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत, मुंबई उच्च न्यायालयाने ‘अॅम्बी व्हॅली’च्या लिलावाची नोटीस प्रसिद्ध केली आहे. ६७ हजार ६२१ एकर जागेवर पसरलेल्या ‘अॅम्बी व्हॅली’ची एकूण किंमत ३४ हजार कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आॅफिशियल लिक्विडेटरने लिलावाची बोली ३७, ३९२ कोटी रुपयांपासून सुरू केली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सोमवारपासून ‘अॅम्बी व्हॅली’च्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली. नोटीस प्रसिद्ध करत, ‘अॅम्बी व्हॅली’च्या लिलावाच राखीव किंमत ३७, ३९२ कोटी रुपये निश्चित केली आहे. नोटीसनुसार, लिलाव दोन टप्प्यांत दोन दिवस करण्यात येणार आहे. ‘अॅम्बी व्हॅली’बरोबरच १४०९.८ एकर व ३२१.६ एकर जमिनींचाही लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव एमएसटीसी लि. द्वारे करण्यात येणार आहे.‘अॅम्बी व्हॅली’च्या लिलावाला १६ सप्टेंबरपर्यंत स्थगिती द्यावी, अशी विनंती करणारी सहारा समूहाची याचिका, सर्वोच्च न्यायालयाने १० आॅगस्ट रोजी फेटाळली. सहाराच्या न्यूयॉर्कमधील मालमत्तेची विक्री लवकरच होणार असून, ७ सप्टेंबरपर्यंत समूहाला १५०० कोटी रुपये सेबीकडे जमा करता येतील, असा दावा सहारा समूहातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला होता. त्यावर न्यायालयाने आधी १५०० कोटी रुपये सेबीकडे जमा करा, मग योग्य तो निर्णय देऊ, असे स्पष्ट केले होते.सहारा समूहाने ३० लाख गुंतवणूकदारांची फसवणूक करून २४,००० कोटी निधी जमा केला. निधी जमा करताना सेबीची परवानगी घेतली नाही. त्यामुळे सेबीने गुंतवणूकदारांचे २४,००० कोटी परत करण्याचे आदेश सहारा समूहाला दिले. मात्र, ‘सहारा’ने गुंतवणूकदारांचे केवळ ६० कोटी परत केले. यावर सर्वोच्च न्यायालयाने ही कारवाई केली. या प्रकरणी सुब्रतो रॉय यांना ४ मे २०१४ रोजी अटक केली. सध्याते रॉय पॅरोलवर आहेत.मॉरिशसमधील ‘रॉयल पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट फंड’ कंपनीने व्हॅलीमध्ये १० हजार ७०० कोटी गुंतविण्याची तयारी दर्शविली होती.>सहारा समूहाच्या मते, ‘अॅम्बी व्हॅली’चे बाजारमूल्य १ लाख कोटींपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तिच्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘अॅम्बी व्हॅली’ची लिलाव प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 5:52 AM