शिक्षक, पदवीधरसाठीच्या मतदार यादीत सुधारणा; ७ जूनला अंतिम यादी; वेळापत्रक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 02:28 PM2024-05-30T14:28:53+5:302024-05-30T14:30:37+5:30
मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून, २६ जून रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या १० दिवस आधीपर्यंत म्हणजे २८ मेपर्यंत मतदार म्हणून नोंदणीसाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेण्यात येतील आणि ७ जूनपर्यंत मतदार यादीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, अंतिम यादी ७ जूनपर्यंत जाहीर केली जाईल. निवडणूक प्रक्रियेबाबत काही सूचना असल्यास राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ३० मेपर्यंत त्या लेखी स्वरूपात मुख्य निवडणूक कार्यालयाकडे सादर कराव्यात, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोकलिंगम यांनी येथे केले. त्यांनी या निवडणुकीसंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बुधवारी बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, सह निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांसह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
काँग्रेस विधान परिषदेच्या दोन जागा लढवणार
काँग्रेस पक्ष विधान परिषदेच्या दोन जागा लढवणार आहे. या संदर्भात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला असून २ जूनला उमेदवारांची घोषणा केली जाईल, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम
विधानसभा सदस्यांनी राज्यसभेवर निवड केलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणुकीची ६ जून रोजी अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १३ जून असेल. १४ जूनला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. १८ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. २५ जूनला मतदान होईल.
आचारसंहिता लागू
- या निवडणुकीसाठी ३१ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल. ७ जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी १० जून रोजी केली जाईल.
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १२ जून आहे. २६ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघांकरिता मतदान होईल. सोमवार १ जुलै २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया ५ जुलै रोजी पूर्ण होणार आहे. संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे.
२८ मे २०२४ रोजीची एकूण मतदारसंख्या
- मुंबई शिक्षक मतदारसंघात १५,९१९
- नाशिक शिक्षक मतदारसंघात ६६,५५७
- मुंबई पदवीधर मतदारसंघात १,१६,९२३
- कोकण पदवीधर मतदारसंघात २,१३,९१७