Join us  

भारतातील उपचारानंतर अमेरिकन युवतीचे जलतरणात कांस्यपदक

By admin | Published: March 19, 2015 12:45 AM

अमेरिकेमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय ख्रिस्ती रॉबर्ट्स या तरुणीला झालेल्या सेरेबेलर अटाक्झिआ आजारामुळे एकटे चालणे, एखादी वस्तू पकडणे अशा दैनंदिन गोष्टी करणे शक्य नव्हते.

मुंबई : अमेरिकेमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय ख्रिस्ती रॉबर्ट्स या तरुणीला झालेल्या सेरेबेलर अटाक्झिआ आजारामुळे एकटे चालणे, एखादी वस्तू पकडणे अशा दैनंदिन गोष्टी करणे शक्य नव्हते. मात्र एप्रिल २०१४ मध्ये ख्रिस्तीवर भारतीय डॉक्टरांनी केलेल्या स्टेम सेल थेरपीमुळे तिने विशेष आॅलिम्पिकमध्ये जलतरण स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. ख्रिस्ती हिला सेरेबेलर अटाक्झिआ हा आजार झाल्यामुळे तिचे स्नायूंवरील नियंत्रण कमी झाले होते. यामुळे कोणतेही काम करताना तिला पालकांचा आधार घ्यावा लागायचा. एप्रिल २०१४ मध्ये ख्रिस्तीला उपचारासाठी भारतात आणले गेले. स्टेम सेल थेरपीमुळे तिचा आजार काही प्रमाणात बरा होऊ शकतो, असे ख्रिस्तीच्या पालकांना सांगण्यात आले होते. २२ एप्रिल २०१४ मध्ये न्यूरोजन ब्रेन अ‍ॅण्ड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये ख्रिस्तीवर पहिल्यांदा स्टेम सेल थेरपी करण्यात आली. त्यानंतर तिला फिजिओथेरपी, व्होकेशन थेरपी आणि स्पीच थेरपीचे उपचार देण्यात आले. यामुळे तिच्यात खूप प्रगती झाल्याचे न्यूरोसर्जन डॉ. आलोक शर्मा यांनी सांगितले. ख्रिस्ती उपचारानंतर अमेरिकेला गेली. यानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये मिसिसिपी येथे झालेल्या विशेष आॅलिम्पिकमध्ये ती सहभागी झाली होती. या वेळी २५ मी. फ्री स्टाईल स्वीम चॅलेंजमध्ये तिने कांस्यपदक पटकावले.सध्या अटाक्झिआसाठी कुठलेही उपचार उपलब्ध नाहीत. पण रुग्णांना यातून बरे करण्यासाठी चालण्यासाठी काठी, सुधारित भांडी आणि संपर्क साधण्याची साधने यांच्या मदतीने अटाक्झिआ रुग्णांना पुन्हा समाजात मिसळण्यासाठी उपयोग होतो. पण मूळ कारण असलेली मेंदूला झालेली हानी तशीच राहते. स्टेम सेलच्या साहाय्याने सेरेबेलर अटाक्झिआ झालेल्या रुग्णांवर उपचार करण्याचा विचार संशोधक आणि डॉक्टर करत आहेत, असे डॉ. नंदिनी गोकुलचंद्रन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)