अमेरिकन भामट्याने महिलेला गंडवले
By admin | Published: February 12, 2016 01:26 AM2016-02-12T01:26:12+5:302016-02-12T01:26:12+5:30
डोंबिवलीत राहणाऱ्या एका ४५ वर्षाच्या कुमारीकेला जीवनसाथी डॉट कॉममार्फत अमेरिकास्थित भामट्याने चक्क १ कोटी २२ लाख २० हजार रु पयांचा गंडा घातला. या प्रकरणात आणखी ३७ जणांचा सहभाग आहे.
डोंबिवली : डोंबिवलीत राहणाऱ्या एका ४५ वर्षाच्या कुमारीकेला जीवनसाथी डॉट कॉममार्फत अमेरिकास्थित भामट्याने चक्क १ कोटी २२ लाख २० हजार रु पयांचा गंडा घातला. या प्रकरणात आणखी ३७ जणांचा सहभाग आहे.
डोंबिवली पूर्वेत आयरे रोडला राहणाऱ्या महिलेने ही तक्रार कागदोपत्री पुराव्यांसह दाखल केली. पावलो विन्स या इसमाने १९ जून २०१४ रोजी या महिलेशी जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाइटवर संपर्क साधला. लग्नाची मागणी घालत त्याच्या पत्नीचे निधन झाल्याचे सांगून या महिलेची माहिती मागवली. लॉस एंजलीस येथे आलिशान घर आहे. तंबाखू आणि दारूचा मोठा ठेका मिळाला आहे, असे सांगून त्याने विश्वास संपादन केला. मात्र, आईची हृदयशस्त्रक्रिया करायची आहे. तसेच इतर विविध कारणे सांगून त्याने पैशांची मागणी केली. यासाठी भारतातील इतर ३६ जणांची नावे पुढे करून त्यांच्या आणि स्वत:च्या नावे विविध बँकांच्या खात्यांत पैसे भरायला भाग पाडले. लग्नासाठी अमेरिकेत कायमचे वास्तव्य मिळावे, यासाठी ग्रीनकार्ड, पासपोर्ट व अन्य कागदपत्रे तयार करतो, असेही त्याने सांगितले. त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर आपण विश्वास ठेवला. मात्र, लग्न नाही आणि पैसेही परत केले नाहीत. यामुळे कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)