Join us

आदित्य ठाकरेंच्या युवासेनेत धुसफूस; विश्वासात न घेता झालेल्या नियुक्त्यांमुळे नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 9:15 AM

मला कुणाचं नाव घेण्यास रस नाही. ज्या अपेक्षेने आम्ही युवासेनेचे स्वप्न पाहिले होते. हक्काच्या युवासेनेसाठी दिवसरात्र झटकतायेत त्यात अडथळा निर्माण करणे, स्वत:चा एककलमी कार्यक्रम करणं या गोष्टीचा त्रास होतोय अशी खंत अमेय घोले यांनी व्यक्त केली.

मुंबई - आदित्य ठाकरेंचे विश्वासू आणि युवासेनेचे पदाधिकारी अमेय घोले नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यावर घोले यांनी थेट स्पष्टीकरण देत युवासेनेतील नियुक्त्यांमध्ये विश्वासात घेतले जात नाही. परस्पर नेमणुका केल्या जातात अशी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकाराबाबत आदित्य ठाकरे यांना वेळोवेळी सांगितले. त्यावर सकारात्मक तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. मी शिवसेनेसोबतच आहे असं अमेय घोले यांनी स्पष्टीकरण दिले. 

अमेय घोले म्हणाले की, आमच्या मनातील शिवसेना, हक्काची युवासेना, बाळासाहेब ठाकरेंचे कुटुंब मनातून, ह्दयातून कुणी काढू शकत नाही. आम्ही नेहमी हिंतचिंतक होतो आणि राहणार. युवासेना बाळाप्रमाणे मोठी केलीय. पण आम्ही जे स्वप्न पाहिले होते ते कुठेतरी विना अडथळा पूर्ण व्हावा ही आमची अपेक्षा आहे. काही महिन्यांपासून काहीजण युवासेनेत स्वत:चं वर्चस्व निर्माण केलंय. त्याबाबत आदित्य ठाकरेंना आम्ही सांगितले आहे. नेहमीच फिडबॅक देतो. परंतु त्यात मोडतोड करून दुसऱ्याने सुचवलेले प्लॅन प्रत्यक्षात उतरवण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी ही नाराजी व्यक्त केली. आमचं म्हणणं आदित्य ठाकरेंकडे मांडत गेलो असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत मला कुणाचं नाव घेण्यास रस नाही. ज्या अपेक्षेने आम्ही युवासेनेचे स्वप्न पाहिले होते. हक्काच्या युवासेनेसाठी दिवसरात्र झटकतायेत त्यात अडथळा निर्माण करणे, स्वत:चा एककलमी कार्यक्रम करणं या गोष्टीचा त्रास होतोय. गेल्या एक दिड वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. मी ज्या भागात नगरसेवक आहे त्याठिकाणी परस्पर नियुक्त्या करण्यात आल्या. मेरिटवर नेमणुका झाल्या नाहीत. जेव्हा जेव्हा पक्षाला गरज पडली तेव्हा मी आणि माझे पदाधिकारी यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला. सर्वाधिक शपथपत्रे दिलीत. सदस्य नोंदणी केली. मात्र ज्यांनी अपेक्षित काम केले नाही त्यांना पदवाटप करण्यात आले. आम्ही कोअर कमिटी सदस्य असून एकच व्यक्ती निर्णय घेणार असेल तर त्याचा फायदा काय? असा सवाल अमेय घोले यांनी केला. 

दरम्यान, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांनी कुटुंबाप्रमाणे वागणूक दिली आहे. मित्र, भावाप्रमाणे वागणूक दिली. मी हक्कानं माझी खंत वरिष्ठांकडे मांडली आहे. सकारात्मक उत्तराची वाट पाहतोय. मी पक्षाचं काम अहोरात्र करत राहीन. इतर पक्षांची तिकीट घेऊन आलेल्यांनी माझ्यावर बोलू नये. माझी नाराजी आदित्य ठाकरेंवर नाही. त्यांच्याकडून मला सकारात्मक ऊर्जा मिळालीय. पण काही नवीन मंडळी शिवसेनेत आलीय. त्यांच्याकडून निर्णय प्रक्रियेत बाहेर ठेवण्यात येते. अविश्वासाची भावना निर्माण केली जातेय असा आरोप अमेय घोले यांनी केला. 

माझी निष्ठा आदित्य ठाकरेंसोबत माझी चर्चा कुणासोबत नाही. माझी निष्ठा आदित्य ठाकरेंसोबत आहे. जो विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवलाय तो सार्थक करण्याचा प्रयत्न मी केलाय. काही दिवसांपूर्वी मी सगळे ग्रुप सोडले. जर आपलं म्हणणं ऐकून घ्यायचं नसेल तर मला त्या ग्रुपमध्ये राहण्यास रस नाही. स्वत:च्या लोकांसाठी काम करत राहावं. ज्या लोकांनी मला निवडून दिलंय त्यांच्यासाठी मी झटत राहीन असं अमेय घोले यांनी स्पष्ट केले.   

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेना