मुंबई : पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (मनसे) आज मोर्चा काढण्यात येणार आहे. गिरगाव चौपाटीजवळील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गावर हा मोर्चा असणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात होईल.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, "चलो हिंदू जिमखाना... बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या परदेशी घुसखोरांना हाकलून द्या, या मागणीसाठी आज मनसेचा बुलंद आवाज मुंबईत घुमणार. या आणि सामील व्हा."
गेल्या महिन्यात 23 जानेवारीला मनसेचे मुंबईत राज्यव्यापी महाअधिवेशन होते. या वेळीही अमेय खोपकर यांनी राज्यातील महाविकास अघाडीमुळे नाराज झालेल्या कडव्या शिवसैनिकांना मनसेत सहभागी होण्याचे जाहीर आवाहन केले होते. त्यावेळी सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका, बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा, असे अमेय खोपकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले होते.
दरम्यान, मनसेच्या आजच्या मोर्चासाठी राज्यभरातून 1 ते 2 लाख लोक येण्याची शक्यता आहे. यासाठी आझाद मैदानावर तयारी सुरू झाली आहे. तसेच, मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करणारे बॅनर मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.
असा असणार मनसेच्या मोर्चाचा मार्ग?गिरगाव चौपाटी- हिंदू जिमखाना येथून दुपारी 12 वाजता मोर्चाला सुरुवात होईल. स्वतः राज ठाकरे मोर्चात सामील असतील. सर्व कार्यकर्ते, मोर्चात सहभागी होणाऱ्या संघटना आणि सर्वसामान्य नागरिक मागे असतील. शामलदास गांधी मार्गावरुन हा मोर्चा पुढे जाईल. तिथून मेट्रो सिनेमा भागात मोर्चा पोहोचल्यानंतर राज ठाकरे आणि काही नेते महापालिका मार्गावरुन आझाद मैदानात आत जातील. मनसे कार्यकर्ते आणि मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्ती फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावरुन तीन गेटनी आझाद मैदानात आत जातील.
पोलिसांची करडी नजरमोर्चात अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दक्षिण मुंबईत अप्पर आयुक्तांच्या नेतृत्वाखाली हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त मार्गावर असणार आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोनद्वारे मोर्चावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
मनसे मोर्चाच्या बसवर भाजपा आमदाराचं नाव; मोर्चानिमित्त मनसे-भाजपा कार्यकर्ते एकत्र?
MNS Morcha Live: मनसेचा महामोर्चा : मोर्चाच्या बसेसवर भाजपा आमदारांचं नाव, चर्चेला उधाण!
मनसेचा महामोर्चा भाजपा पुरस्कृत; शिवसेनेची राज ठाकरेंवर जहरी टीका
हिंदू जिमखाना ते आझाद मैदान... 'मनसे'चा महामोर्चा, पोलिसांची करडी नजर