खिशातील पैसे काढले म्हणून अमीनाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 07:13 AM2018-03-08T07:13:04+5:302018-03-08T07:13:04+5:30
वेश्यागमनासाठी गेला असता ‘तिने’ खिशातील ९ हजार रुपये काढले म्हणून ग्राहकानेच अमीना अब्दुल गणी (३०)ची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. यासंदर्भात अब्दुल हमीद अन्सारी (२२) यास पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई : वेश्यागमनासाठी गेला असता ‘तिने’ खिशातील ९ हजार रुपये काढले म्हणून ग्राहकानेच अमीना अब्दुल गणी (३०)ची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. यासंदर्भात अब्दुल हमीद अन्सारी (२२) यास पोलिसांनी अटक केली आहे.
सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर रविवारी रात्री देहविक्रीसाठी उभ्या असलेल्या अमीना अब्दुल गणी (३०) हिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी
एमआरए मार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव मोरे, सुभाष दूधगावकर, सहायक पोलीस निरीक्षक सुहास माने, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, किरण पाटील, योगेश भोसले, पीर मोहम्मद शेख, पोलीस हवालदार विनोद कांबळे, पोलीस नाईक विलास खाडये आणि पोलीस शिपाई कैलास भोईटे यांच्या विशेष पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. संशयित तरुणांची धरपकड सुरू केली. आरोपी पी डिमेलो रोडच्या दिशेने पसार झाल्याचे मैत्रिणीच्या जबाबातून समजले. त्यानुसार, पथकाने तेथे शोध घेतला. कल्पना जंक्शनवर असलेल्या जीपीओ कम्पाउंडमध्ये आरोपीने फेकलेला चाकू सापडला. तेथील सीसीटीव्ही फूटेज तपासले. तो एका टॅक्सीत बसून जे. जे. उड्डाणपुलावरून पुढे निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या मार्गावरील सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर आरोपी नागपाड्यातील सागर जंक्शनवर उतरल्याचे दिसले. याच फूटेजच्या आधारे पथकाने आरोपीसोबत बोलत असलेला अख्तर अन्सारी याला ताब्यात घेतले. डोंगरी येथील एका कपडे बनविण्याच्या कारखान्यात तो काम करायचा.
चाकूने केले सपासप वार
♦अमीनाने त्याच्या खिशातील
९ हजार रुपये काढून घेतले
♦पैसे परत मिळावेत म्हणून त्याने
तिच्याकडे विनवणी केली.
♦तिने ते दिले नाहीत. अखेर त्याने
तिचा पाठलाग केला.
♦जवळूनच चाकू खरेदी केला
आणि रागात तिच्यावर चाकूने
सपासप वार केल्याची कबुली
पोलिसांना दिली आहे.