लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या वर्षभरापासून सक्तवसुली संचालनालयाच्या ( ईडी) रडारवर असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित याची ईडीने सलग दुसऱ्या दिवशी ४ तास चौकशी केली. त्याला पुन्हा ६ जुलैला हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मनी लॉड्रींग व पुण्यातील एका बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात अमित भोसले याच्याकडे शुक्रवारी पाच तास चौकशी केली होती. काही कागदपत्रे जमा न केल्याने त्याला शनिवारी पुन्हा पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार तो सकाळी अकराच्या सुमारास बेलार्ड पियार्ड येथे हजर झाला होता. त्याच्याकडे जवळपास चार तास प्रलंबित विषयासंबंधी विचारणा करण्यात आली. सरकारी जागेवर उभारलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या अनुषंगाने सरकार व संबंधितांशी केलेला पत्रव्यवहार व आर्थिक व्यवहार तपासण्यात येत आहे. त्याबाबत सविस्तर जबाब नोंदविला जात असल्याने अमितला पुन्हा मंगळवारी सकाळी कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी अविनाश भोसले, अमित भोसले यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, हायकोर्टाने त्यामध्ये हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेत भोसले पिता-पुत्रांना चौकशीला समोरे जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अविनाश भोसले यांची १ जुलै रोजी तर अमित याची २ व ३ जुलै रोजी चौकशी करण्यात आली.
ईडीने गेल्या आठवड्यात ‘फेमा’ कायद्यांतर्गत ४० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यांचे पुणे, नागपुरातील व गोव्यातील हॉटेल व भूखंड जप्त करण्यात आले आहे.