मुंबई - मनसेने शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर मनसेला मंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरू आहे. याबाबत अमित ठाकरेंना (Amit Thackeray) पत्रकारांनी विचारलं असता, मला राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री व्हायला आवडेल असं सांगत मंत्री होणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. तसेच, गृहमंत्रीपद देणार असतील तर नक्कीच मंत्री होईल, असे मिश्कील उत्तरही त्यांनी दिले. त्यावरुन, आता शिवसेनेच्या नेत्या आणि कायम वादग्रस्त ट्विट करत मनसे व भाजपवर टिका करणाऱ्या दिपाली सय्यद यांनी ट्विट करुन अमित ठाकरेंना खोचक टोला लगावला.
दिपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा मनसेला डिवचलं आहे. मनसेच्या दोन्ही नेत्यांवर दिपाली यांनी निशाणा साधला. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनाही टोलाही लगावला आहे. ''मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती, अमित म्हणजे कार्यकर्त्यांना सोडून घरी बसलेला गृहमंत्री, असल्याचा खोचक टोला दिपाली यांनी लगावला. तसेच, शॅडो कॅबिनेटने अयोध्याला जाता येत नसते रे भोंगामंत्री. तुम्ही गृहमंत्री तर ब्रिजभूषण कोण तुमचा सरंक्षण मंत्री का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. त्यामुळे, आता मनसेकडून दिपाली सय्यद यांना काय प्रत्युत्तर मिळणार याची चर्चा होत आहे.
राज ठाकरेंनी आराम करावा
''माननीय लोक पहिले बोलतात मोदीजींबद्दल, नंतर करतात पवार साहेबांच्या मनासारखे, वेळ येईल तशी पलटी मारतात, हे संपुर्ण अयोध्यालाच नाही तर देशाला माहीत आहे. माननीय राजसाहेबांनी आजारी असल्याने आराम करावे आदरणीय उद्धव साहेब लवकरच तुम्हाला भेटायला येतील सतत आठवण काढू नये''. अशा शब्दात ट्विट करत दिपाली सय्यद यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मनसेला दोन मंत्रिपदे मिळणार असल्याची चर्चा सुरू असल्याबाबत त्यांना प्रश्न विचारला. गृहमंत्री पद देणार असतील तर नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्तेत सहभागी होऊ, पण ते देत नाहीत ना, असा मिश्किल टोला ठाकरे यांनी यावेळी लगावला. यावेळी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेत, वर्षानुवर्षे असलेल्या त्या कायम असल्याची नाराजी व्यक्त केली. राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे या भावांनी महाराष्ट्रात संवाद दौरे सुरू केले आहेत.
राज ठाकरेंचा आराम, तर अमित ठाकरे दौऱ्यावर
अमित ठाकरे मात्र राज्यात ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर लोकांच्या भेटीगाठी घेण्यात व्यग्र आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) राज्यातील सत्तासंघर्षापासून बरीच दूर आहे. अध्यक्ष राज ठाकरे देखील शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करत होते. तेही अजून फारसे काही बोलले नाहीत आणि सक्रिय देखील झालेले नाहीत. पण आपल्या पक्षाची बांधणी करण्याची धुरा अमित ठाकरेंनी घेतलेली दिसत आहे. अमित ठाकरे यांनी दादर ते अंबरनाथ असा लोकलने प्रवास केला. त्यानंतर अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. अंबरनाथ पूर्वेतील रोटरी सभागृह येथे विद्यार्थी तसेच पदाधिकारी यांच्याशी बंददाराआड त्यांनी संवाद साधला.