अमरीश पटेलांच्या कंपनी कर्मचा-याचा संशयास्पद मृत्यू; दोन दिवस ‘प्राप्तिकर’चे छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 05:55 AM2018-01-21T05:55:45+5:302018-01-21T05:55:54+5:30
काँग्रेस आमदार अमरीश पटेल यांच्या डेसन टेक्सफॅब या कंपनीत लेखा विभागात काम करणारे ज्येष्ठ अधिकारी सी. ए. कुट्टी (६४) यांचा मीरा रोड येथे रेल्वे स्थानकानजीक अपघातात मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. हा अपघाती मृत्यू नसून, आत्महत्या असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
मीरा रोड : काँग्रेस आमदार अमरीश पटेल यांच्या डेसन टेक्सफॅब या कंपनीत लेखा विभागात काम करणारे ज्येष्ठ अधिकारी सी. ए. कुट्टी (६४) यांचा मीरा रोड येथे रेल्वे स्थानकानजीक अपघातात मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. हा अपघाती मृत्यू नसून, आत्महत्या असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. कुट्टी यांच्या घरी प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांनी छापे घालून दोन दिवस तपास चालवला होता.
मीरा रोडच्या शांती पार्कमधील गोकूळ व्हिलेज वसाहतीत कुट्टी हे पत्नी व धाकट्या मुलासह राहत होते. त्यांचा मोठा मुलगा स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये अधिकारी असून तो पुण्याला पत्नीसह राहतो. धाकटा मुलगाही बँकेत असून त्याचा साखरपुडा झाला होता.
शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास मीरा रोड रेल्वे स्थानकाच्या आधी फलाट क्रमांक ४वर येणाºया लोकलच्या धडकेत त्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद वसई रेल्वे पोलिसांनी केली आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
चौकशीमुळे कुट्टी व्यथित
- कुट्टी हे पटेल यांच्या मूळच्या धुळे येथील कंपनीच्या विलेपार्ले येथील कार्यालयात २५ वर्षे लेखा विभागात काम करत होते. १७ जानेवारी रोजी प्राप्तिकर विभागाच्या ८ ते १० अधिकाºयांनी कुट्टी यांच्या निवासस्थानी छापे घातले.
- दोन दिवस हे अधिकारी कुट्टी यांच्या घरीही ठाण मांडून चौकशी करत होते. त्यामुळे कुट्टी व्यथित झाले.