BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
By देवेश फडके | Published: November 26, 2024 06:52 PM2024-11-26T18:52:05+5:302024-11-26T18:53:56+5:30
अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव आणि या प्रक्रियेतून एक चांगला धडा मिळाला आहे. यातून नेमका तो बोध घेऊन ते पुढे जातील, अशीच अपेक्षा आता व्यक्त केली जाऊ शकते.
२०२४ ची विधानसभा निवडणूक ऐतिहासिक ठरली. 'न भूतो' असे यश महायुतीला मिळाले. एखाद्या लँडस्लाइडप्रमाणे हा विजय महायुतीला मिळाला. या लँडस्लाइडखाली महाविकास आघाडीचा चक्काचूर झाला. भाजपाला १३२, शिवसेना शिंदे गटाला ५७, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर दणदणीत विजय मिळाला, तर काँग्रेसला १६, शिवसेना ठाकरे गटाला २० आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १६ जागा मिळाल्या. समाजवादी पक्षाला २ आणि अन्य तसेच अपक्षांना १० जागा मिळाल्या.
लोकसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालांनंतर महायुतीने पुन्हा कंबर कसून तयारीला सुरुवात केली. याच निकालांचा आधार घेऊन आता राज्यात परिवर्तन होणार, आमचेच सरकार स्थापन होणार, या 'ओव्हर कॉन्फिडन्स'मध्ये महाविकास आघाडी गाफील राहिली. त्यानुसारच पुढील रणनीती आखण्यात आली. नेहमीप्रमाणे भाजपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सोबत घेऊन आपले राजकीय कौशल्य पणाला लावले. तर, शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनीही स्वतःला प्रचारात झोकून दिले. खरी परीक्षा अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची होती. परंतु, त्यांनीही राजकीय कसब आणि अनुभवाचा पूरेपूर वापर करून घेतला आणि महायुतीला भक्कम साथ दिली. राजकीय तज्ज्ञ असो वा विश्लेषक असो, अवघी कारकीर्द, आयुष्य राजकारणात घालवलेल्या धुरंधरांनाही असा निकाल लागेल, याचा अंदाजही आला नाही. अनेकार्थाने ही निवडणूक गाजली. पण या घडामोडींमध्ये राज्याचे लक्ष लागले होते, ते मनसे, राज ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या उमेदवारीकडे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले पाढे पंचावन्न
राज ठाकरे नावाचे गारुड संपूर्ण महाराष्ट्रावर असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. ठाकरी शैली, भाषेवरील पकड, शब्दांवरील प्रभुत्व, मुद्दे मांडण्याची आणि कोणालाही अंगावर घेण्याची असलेली ताकद यांमुळे राज ठाकरे हे तरुणांच्या गळ्यातील ताईत. कुठेही सभा असो, हजारो लोकांची उपस्थिती असणारच. पुन्हा एकदा आपले नशीब आजमवण्यासाठी राज ठाकरे या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ‘मनसे’ उतरले. ना महायुती, ना मविआ; कोणासोबतच न जाता स्वबळावर लढण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आणि निवडणुकीची तयारी सुरू केली. या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अमित ठाकरे उतरणार असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात होतीच, पण मनसेच्या पहिल्या यादीत यावर शिक्कामोर्तब झाले आणि राजपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरण्यास सज्ज झाले. परंतु, निवडणुकीच्या निकालानंतर मनसेची धूळधाण उडाल्याचेच दिसले. एकही उमेदवार मनसेचा निवडून आला नाही. मतांची टक्केवारीही कमी झाली आणि आता पक्षाची मान्यता आणि चिन्हही धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.
चक्रव्यूहात शिरले खरे, पण तयारी कितपत केली होती?
अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, यावर उमेदवारी यादीत झालेल्या शिक्कामोर्तबापासून ते निकाल लागेपर्यंतचा घटनाक्रम डोळ्यासमोर आणल्यास एक गोष्ट स्पष्टपणे आणि प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे तयारी. अमित ठाकरे यांना खरोखरच विधानसभा निवडणूक लढवण्यात रस होता, तर तशी तयारी त्यांनी केली होती का, असा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात आला. शरद पवारांनी जसे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासूनच युगेंद्र पवार यांना या प्रक्रियेत सहभागी करून घेतले. तसेच राज ठाकरे आणि अमित यांनीही करणे अपेक्षित होते. लोकसभा निवडणुकीपासूनच प्रकाशझोतात, जनतेत, जनसंपर्कात, मीडियात राहायला हवे होते. कारण निवडणूक प्रक्रिया ही साधी, सरळ आणि सोपी गोष्ट नाही. एक निवडणूक लढवायची म्हटली की, प्रचंड मेहनत, सातत्याने जनतेत राहणे, अखंड प्रकाशझोतात असणे, सोशल मीडियाचा पूरेपूर वापर करून घेणे, जनसंपर्क वाढता ठेवणे, अशा कैक गोष्टी येतात. या सगळ्यांत अमित ठाकरे कुठपर्यंत पोहोचले, याचे उत्तर फार आशावादी नाही.
सगळेच चुकत गेले का? नेमके काय, कुठे आणि कसे?
निवडणूक लढायची म्हटली की जनसंपर्क आलाच. कार्यकर्त्यांचा पाठिंबा, लोकांचे समर्थन हेही आलेच. परंतु, त्यासोबत या सगळ्याचे नेतृत्व करून बाजी मारण्यासाठी अनेक गोष्टी अंगी बाणवाव्या लागतात. अनेक बाबींवर भर आणि जोर द्यावा लागतो. जनतेची, मतदारांची नेमकी नस ओळखावी लागते. दिवसभर धावपळ, मेहनतीचे सातत्य आणि अखंड परिश्रम करावे लागतात. एक ना अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते. आडाखे बांधावे लागतात, प्रयोग करावे लागतात. एकंदर परिस्थिती पाहता अमित ठाकरे यांनी या सगळ्या चेकबॉक्सपैकी किती ठिकाणी अचूक आणि चोख टिकमार्क केली, हा महत्त्वाचा विषय आहे. राज ठाकरे यांची भाषणे ऐकणे आपण बंद केल्याचे अमित यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले. कुठेतरी त्याचे दडपण जाणवू शकते, असं त्यांना वाटत होते. परंतु, अमित ठाकरे यांनी स्वतःची शैली निर्माण करण्यासाठी, संवाद कौशल्यात तरबेज नव्हे, किमान पटाईत होण्यासाठी फारसे प्रयत्न केलेले प्रथमदर्शनी तरी दिसले नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. त्यात सगळीकडे ते चाचपडतानाच दिसले. त्यात आत्मविश्वास कमी होता. हिंदीत उत्तरे देताना त्यांची तारांबळ उडाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. माहीम मतदारसंघात झालेल्या प्रचारसभेतही अमित ठाकरे यांचे भाषण प्रभावी झाले, असा सूर कुठेही उमटताना दिसला नाही. एकंदरीतच अमित ठाकरे यांना सूर गवसलाच नाही का, असा प्रश्न यामुळे निर्माण होतो.
मुरब्बी नेते, कसलेले राजकारणी यांच्याशी दोन हात करणे कठीणच
अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातूनच उमेदवारी का देण्यात आली, हेही अनाकलनीय (राज यांच्याच भाषेत) असल्याचं अनेक राजकीय जाणकार म्हणतात. भांडुपसासखी जागा त्यांच्यासाठी जास्त सेफ होती, असे अनेक मनसैनिकांनाही वाटते. परंतु, माहीम मतदारसंघच निश्चित करण्यात आला. या मतदारसंघातील लढत सर्वांधिक लक्षवेधी, उत्सुकतेची आणि नेमके काय होणार, अशीच झाली. अमित ठाकरेंच्या नावाची घोषणा केल्यानंतर लगेचच शिवसेना शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर, आता उद्धव ठाकरे काय करणार?, अमित यांच्याविरोधात उमेदवार न देऊन, मनसेने वरळीत केलेल्या मदतीची परतफेड करणार का, याबद्दल उत्सुकता होती. परंतु, याला छेद देत ठाकरेंनी महेश सावंत या भरवशाच्या शिलेदाराला रिंगणात उतरवले. यानंतर महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून उमेदवारी मागे घेण्यासाठी हालचाली झाल्या. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हो-नाही सुरू राहिले, वरिष्ठ पातळीवरूनही प्रयत्न झाले, पण कुणीच आपला 'हट्ट' न सोडल्याने लढत तिरंगी झाली. सुरुवातीला भाजपाने उघडपणे अमित ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला. परंतु, कालांतराने चित्र पालटत गेले. 'महायुतीचा धर्म' वरचढ ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्कवर महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली, तिथे सदा सरवणकर यांची महायुतीचा उमेदवार म्हणून मंचावरील उपस्थिती सर्वच काही सांगून गेली.
परीक्षा दहावीची, पण अभ्यास दुसरीचा!
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे म्हणजे अभ्यासही तसाच करावा लागतो. एखादा माणूस जन्मापासूनच एका भागात राहात असला, तरी निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिकांचे मुद्दे, सर्वसामान्यांचे प्रश्न आणि ते सोडवण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, त्यासाठी लागणाऱ्या आणि राबणाऱ्या यंत्रणा, त्यांच्या प्रक्रिया यांची पुरेपूर माहिती आणि अभ्यास करणे अत्यंत आवश्यक असते. मुद्द्यांची, प्रश्नांची जाण असावी लागते. नेमकी हीच कमतरता अमित ठाकरे यांच्याबाबतीत दिसून आली. एका मुलाखतीत बोलताना ते जात असलेल्या जीमच्या शेजारी राहत असलेल्या आज्जींनी सांगितलेली समस्या आणि त्यावर करण्यात आलेली उपाययोजना या वानगी दाखल दिलेल्या उदाहरणात कुठेही अमित ठाकरे यांचा प्रभाव, भूमिका दिसली नाही. त्यामुळे तो प्रश्न, ती समस्या आणि त्यावरील उपाय हा नगरसेवक पातळीवरील होता, असेच दिसून आले. अमित ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे, समस्या या स्थानिक पातळीवर महत्त्वाच्या असल्या तरी त्या आमदारकीच्या निवडणुकीच्या दृष्टीने कुचकामी ठरल्या, असेच चित्र निकालानंतर दिसले.
ठाकरे नावाचे वलय, वडिलांच्या नावाचे मृगजळ आणि निकालात झालेली घसरगुंडी
अमित ठाकरे हे राज ठाकरे यांचे सुपुत्र, ठाकरे घराण्यातील निवडणुकीत उतरलेली दुसरी व्यक्ती, या भोवतीच निवडणूक राहिली. ते तसे होणे अपेक्षितच असले तरी अमित ठाकरे यांनी आपला वेगळा ठसा, वेगळी शैली तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली, असे दिसून आले नाही. परिणामी माहीम मतदारसंघात अमित ठाकरे थेट तिसऱ्या स्थानी राहिले. अमित ठाकरे यांना ३३ हजार ०६२ मते मिळाली. शिवसेना शिंदे गट आणि मनसेच्या भांडणात ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचाच फायदा झाला आणि तेच बाजी मारून गेले. राज ठाकरे यांनी ब्लूप्रिंट आणली किंवा कितीही प्रभावी जाहीरनामा प्रसिद्ध केला, तरी लोकसभा निवडणुकीत मनसे पक्ष उतरला नाही.
राज ठाकरे - ना लढाई जिंकले, ना तहात
आदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतल्यावर केवळ लढाईत नाही, तर तहात जिंकण्यासाठीही रणनीती आखल्याचे पाहायला मिळाले. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू, उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि ठाकरे घराण्यातील निवडणुकीत उतरणारा पहिला सदस्य या सगळ्या गोष्टींचा पूरेपूर वापर करून घेण्यात आला. सचिन अहिर यांच्यासारख्या नेत्याला सोबत घेतले गेले आणि आदित्य ठाकरे यांच्या बाजूने विजय संपादन करण्याच्या दृष्टीने सर्व प्रकारचे कवच तयार करण्यात आले. परंतु, या गोष्टी राज ठाकरे यांनी केल्याचे पाहायला मिळाले नाही. अमित ठाकरे यांना निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय झाला होता, तर तशी रणनीती आखणे अपेक्षित होते. केवळ उद्धव ठाकरे यांनी उमेदवार देऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा यांना विश्वासात घेऊन सुरक्षित कडे तयार करणे अपेक्षित होते. अगदी शेवटच्या क्षणी सदा सरवणकर 'शिवतीर्थ'वर आले असतानाही त्यांची भेट घेऊन, सकारात्मक बोलणी करून तोडगा काढणे अपेक्षित होते. परंतु, तसे काही घडले नाही. अखेर ज्याची भीती होती, तेच झाले, राजपुत्र अमित ठाकरे आधुनिक अभिमन्यू झाले आणि निवडणुकीचे चक्रव्यूह भेदण्यात अपयशी ठरले.
जाता जाताः शेवटी राजकारणात यायचे म्हणजे अनेक गोष्टींची तयारी करावी लागते, अभ्यास करावा लागतो, संवाद कौशल्य, भाषेची जाण, त्यावरील पकड, शब्दांवरील प्रभूत्व अगदी परमोच्च पातळीवर नेता आले नाही, तरी बेसिक तयारी आवश्यकच ठरते. मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता आहे, असे म्हणून फक्त भागत नाही, ते कृतीतून सिद्ध करावे लागते. परिस्थितीला अंगावर घेण्याची जिद्द, भिडस्त वृत्ती अंगी बाणवावी लागते. लगेच या गोष्टी शक्यच नाहीत. पण त्याची सुरुवात करून सातत्य टिकवणे महत्त्वाचे असते. अमित ठाकरे पहिल्या परीक्षेत अपयशी झाले असले तरी ते थांबणाऱ्यांपैकी नाहीत. त्यांनी स्वतःही निकालानंतर तशीच प्रतिक्रिया दिली आहे. आता ते हे अपयश विसरून नवी भरारी घेण्यासाठी किती मनसे प्रयत्न करतात, हे कळेलच! त्यावरच त्यांचा पुढचा प्रवास अवलंबून आहे.
- देवेश फडके.