अमित साटम प्रकरणाचे महापालिकेत पडसाद; विरोधकांनी मांडला हरकतीचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 06:07 AM2018-04-01T06:07:44+5:302018-04-01T06:07:44+5:30
भारतीय जनता पार्टीचे आमदार अमित साटम यांनी महापालिकेच्या अभियंत्याला केलेल्या कथित शिवीगाळीचे तीव्र पडसाद शनिवारी मुंबई महापालिकेच्या सभागृहात उमटले.
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे आमदार अमित साटम यांनी महापालिकेच्या अभियंत्याला केलेल्या कथित शिवीगाळीचे तीव्र पडसाद शनिवारी मुंबई महापालिकेच्या सभागृहात उमटले.
विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी साटम यांच्या वक्तव्याचा निषेध करत, हरकतीच्या मुद्द्याची मागणी केली. भाजपाने त्यास विरोध केला. परिणामी, काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार घोषणाबाजी झाली.
साटम प्रकरणी काँग्रेसने निषेध नोंदवला, साटम यांच्या वक्तव्याचा उल्लेखही आपण करू शकत नाही, असे सांगत अधिकारी वर्गाचे खच्चीकरण केले जात असेल, तर साटम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. भाजपाने काँग्रेसच्या हरकतीच्या मुद्द्याला आक्षेप घेत घोषणाबाजी केली. साटम यांनी ५० हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढल्याने, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे भाजपाने सांगितले. हरकतीचा मुद्दा घेतला जाऊ शकत नाही, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.
गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी
अमित साटम यांची काही चूक नाही. हे फोन रेकॉर्ड कथित आहे. यात तथ्य नाही, हे सांगण्याचा प्रयत्न भाजपा नगरसेवकांनी केला. काँग्रेस आता आयुक्तांकडे साटम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे. आवाज खरा आहे की खोटा आहे? तपासावे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
अमित साटम प्रकरणात योग्य कारवाई झाली पाहिजे. आमच्या इंजिनीअरच्या संयुक्त कृती समितीची सोमवारी बैठक आहे. त्यानंतर, न्यायालयात धाव घ्यायची की पोलिसांत जायचे? याचा निर्णय घेतला जाईल.
- साईनाथ राजाध्यक्ष, सरचिटणीस,
म्युनिसिपल इंजिनीअर युनियन