Join us

गोखले पूलाच्या रेल्वेच्या दिशेचा धोकादायक पूल त्वरित बंद करा; अमित साटम यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: November 02, 2022 3:50 PM

सदर पूलाचे काम लवकर सुरू करून २०२४ पर्यंत सुरू करा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई-अंधेरीतील  पूर्व व पश्चिम भागाला जोडणारे गोपाळ कृष्ण गोखले हा पश्चिम  रेल्वेवरील महत्वाचा उड्डाणपूल आहे. दि,२ जुलै २०१८ साली या पुलावरील पादचारी पुलाचा भाग कोसळून अनेक जण जखमी झाले होते तर काही निष्पाप नागरिकांचा या दुर्घटनेत  मृत्यू झाला होता. नंतर अखेर या पुलाचे बांधकाम पूर्णपणे पाडून नव्याने याचे बांधकाम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. 

 गोखले पुलाच्या सुरू असलेल्या पालिकेच्या भागाचे काम पूर्णत्वाकडे असताना मात्र रेल्वेच्या भागाचे पूलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. तथापि, बीएमसी सल्लागार, एससीजी सल्लागार सेवांच्या अहवालानुसार, सध्याचा पूल अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. पूला खालून पश्चिम रेल्वे धावत असल्याने कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो. त्यामुळे सदर रेल्वेच्या भागाकडचा पूल त्वरित बंद करावा अशी मागणी अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्राचे आमदार अमित साटम यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

रेल्वेच्या भागातील पुलाची निविदा प्रक्रिया युद्धपातळीवर कार्यान्वित करून पुढील २ महिन्यांत सदर उर्वरित पूलाचे काम वेगाने सुरू करा जेणेकरून नवीन गोखले  पूल २०२४ पर्यंत सुरू होईल असे आमदार साटम यांनी पत्रात नमूद केले आहे. सदर पूल बंद केल्यावर वाहतूक विभागाला पर्यायी मार्ग सूचवून आणि वाहतूक सुरळीत करा अशी मागणी देखिल त्यांनी केली आहे.

याप्रकरणी आपण तातडीने लक्ष देवून कागदी घोडे नाचवून एका ओळींचे उत्तर आपण देण्याएवजी आपण यासंदर्भात केलेल्या कारवाईची माहिती द्या अशी विनंती त्यांनी पालिका आयुक्तांना शेवटी केली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अमित साटमअंधेरी