अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीत माशी शिंकली?; दौऱ्यात 'मातोश्री'चा उल्लेख नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:19 PM2018-06-06T12:19:43+5:302018-06-06T13:01:24+5:30

आज संध्याकाळी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची भेट नियोजित होती.

Amit Shah and Uddhav Thackeray most awaited meet on Matoshree may get cancelled | अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीत माशी शिंकली?; दौऱ्यात 'मातोश्री'चा उल्लेख नाही

अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीत माशी शिंकली?; दौऱ्यात 'मातोश्री'चा उल्लेख नाही

Next

मुंबई: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षीत भेटीबद्दल अचानक संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हे दोन्ही नेते भेटणार होते. मात्र, आज सकाळी अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याची कार्यक्रमपत्रिका पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात या भेटीबद्दल शंका निर्माण झाली आहे. 

शिवसेना व भाजपाच्या गोटातून कालपर्यंत उद्धव आणि अमित शहा यांची भेट होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त बुधवारी छापून आलेल्या अग्रलेखानंतर अमित शहा नाराज झाल्याची चर्चा आहे. या अग्रलेखात अमित शहा यांच्या संपर्क अभियानाची यथेच्छ खिल्ली उडविली आहे. त्यामुळे अमित शहा यांनी उद्धव यांच्यासोबतची नियोजित भेट रद्द केल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

दरम्यान, अमित शहा यांचे काही वेळापूर्वीच मुंबईत आगमन झाले असून ऐनवेळी त्यांच्या दौऱ्यात आणखी काही बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीला मुंबई विमानतळावरून ते थेट अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या घरी जाणे अपेक्षित होते. मात्र, ते सध्या वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात दाखल झाले आहेत. याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार हेदेखील उपस्थित आहेत. सध्या रंगशारदामध्ये भाजपाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरु  झाली आहे. ही बैठक आज रात्री म्हणजे उद्धव यांच्या भेटीनंतर अपेक्षित होते. मात्र, शहा यांनी आपल्या दौऱ्यात ऐनवेळी अनेक बदल केले आहेत. त्यामुळे आता  अमित शहा मातोश्रीवर जाणार की नाही, याकडे सगळे डोळे लावून बसले आहेत. 

अमित शहा यांच्या नियोजित दौऱ्यानुसार आता ते थेट जुहू येथील माधुरी दीक्षितच्या निवासस्थानी जातील. त्यानंतर ते सह्याद्री अतिथीगृहावर जातील. याठिकाणी ते काही भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेतील. दुपारी साडेचार वाजता ते पेडर रोडवरील रतन टाटा यांच्या निवासस्थानी जातील. त्यानंतर साधारण साडेपाचच्या सुमारास ते लता मंगेशकर यांचे निवासस्थान असलेल्या 'प्रभूकुंज' येथे जातील. याठिकाणी काही काळ थांबून अमित शहा संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास सिद्धीविनायक मंदिर आणि त्यानंतर वांद्र्यातील आशिष शेलार यांच्या निवासस्थानी जाणे अपेक्षित आहे. कार्यक्रम पत्रिकेनुसार साडेसात ते पावणेनऊ या वेळेत अमित शहा शेलारांच्या घरी असतील. या सव्वातासाच्या काळात काही वेळ ऐनवेळच्या कार्यक्रमांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. याच वेळेत अमित शहा मातोश्रीवर जातील, अशी शक्यताही वर्तविली जात आहे. शिवसेनेच्या गोटातील माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी अमित शहांच्या भेटीसाठी वेळ राखून ठेवला आहे. मात्र, अमित शहांनी ही भेट परस्पर रद्द केली असली तरी शिवसेनेला अजूनपर्यंत याबाबत कळविण्यात आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

 

 

Web Title: Amit Shah and Uddhav Thackeray most awaited meet on Matoshree may get cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.