मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहमुंबईत दाखल झाले आहे. मुंबईमध्ये अमित शाह यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यासह आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रविण दरेकरही अमित शाह यांच्या स्वागतासाठी गेले होते.
मुंबईत दाखल झाल्यानंतर अमित शाह सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. याठिकाणी अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, अमित शाह हे उद्या सुद्धा दिवसभरात महायुतीच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत. यानंतर राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
महायुतीमधील तीनही प्रमुख पक्षांकडून वेगवेगळा जागांवर दावा केला जात आहे. त्यामुळे राज्यातीलअनेक जागांवर तिढा निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला आधी शिंदे गटाला मिळतील तितक्याच जागा आपल्यालाही हव्यात, असा दावा होता. विशेष म्हणजे अजित पवार गट १७ जागांवर ठाम आहे. त्यापैकी १० जागांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे शिंदे गटाचा २३ जागांवर दावा आहे. तर भाजपाकडून महाराष्ट्रात ३२ लोकसभा जागांची मागणी आहे, त्यामुळे हा तिढा अमित शाह कसा सोडवतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.