मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपाला व्यंगचित्रातून लक्ष्य केले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे भाजपाला पडलेलं दिवाळी स्वप्न असून, अमित शहा हे नरकासूर असल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. राज ठाकरे यांनी व्यंगचित्रात अमित शहा यांना नरकासुराच्या स्वरुपात दाखवलं आहे. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. तो दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा करण्यात येतो. आज नरक चतुर्दशी... या दिवसाची सुरुवात आंघोळ केल्यानंतर कारेटं पायाखाली एका फोडले जाते. त्याच कारेटे म्हणून अमित शहा यांना दाखवण्यात आले आहे. भाजपा पार्टी झोपलेली असून, अमित शहारुपी नरकासुराला चिरडण्याचे स्वप्न पाहत असल्याचे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.
(साहेब,अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आलाय!; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा
दरम्यान, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. आज नरक चतुर्दशी, आजच्या दिवशी अभ्यंगस्नान करण्याचीही परंपरा आहे. याचाच संदर्भ घेत राज ठाकरे यांनी व्यंगचित्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्यावर टीका केली आहे. या चित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभ्यंगस्नानाच्या परंपरेप्रमाणे आंघोळीच्या आधी अंगाला तेल लावून घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. याचदरम्यान,एक जण येऊन त्यांच्या कानामध्ये बोलतो की, साहेब... अख्खा महाराष्ट्र तुम्हाला 'धुवायला' आलाय, पाठवू का?. तर दुसरीकडे, चित्रात मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर लोकांची तोबा गर्दी जमलेली दाखवण्यात आली आहे.
एकूणच, राज ठाकरे यांनी या व्यंगचित्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे.
(भारत ICU मध्ये; लोकसभा निवडणुकीनंतर शुद्धीवर येईल!... राज ठाकरेंचं कार्टुन)
धनत्रयोदशीच्या दिवशीही राज ठाकरे यांनी देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य करणारे व्यंगचित्र आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले होते. याचित्राद्वारे त्यांनी भाजपाला चांगलेच फटकारले आहे.
राज ठाकरे काय म्हटलंय व्यंगचित्रात?
हा दिवस अनेक प्रकारे साजरा केला जातो. वैद्यकीय शास्त्राचा देव 'धन्वंतरी' ह्याचा जन्मदिवस म्हणूनही काही लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात!,असे सांगत राज ठाकरे यांनी 'भारत' देशाला आयसीयूमध्ये दाखवले होते.
यावर आयसीयूबाहेर काळजीत उभे असणाऱ्या जनतेला धन्वंतरी सांगत आहेत की, काळजीचे कारण नाही! परंतु गेल्या चार-साडेचार वर्षात त्याच्यावर खूपच अत्याचार झालेत! लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर !, अशा शब्दांत त्यांनी थेट भाजपा सरकारवर बोचरी टीका केली.