खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील १२ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सदर घटनेबाबत आता कार्यक्रमाला विशेष उपस्थित असणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत संवेदना व्यक्त केल्या आहे. अमित शाह ट्विट करत म्हणाले की, काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्रीसदस्यांच्या जाण्याने, माझे मन जड झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो, असं अमित शाह ट्विटरद्वारे म्हणाले.
दरम्यान, खारघर येथील सोहळ्याची जय्यत तयारी महाराष्ट्र शासनाने केली होती. जवळपास ३५० एकर जागेवर काही लाख श्री सदस्य मागील तीन दिवसांपासून या ठिकाणी राज्यातील विविध भागांतून दाखल झाले होते. या घटनेत जवळपास ३५० पेक्षा जास्त जणांना वेगवगेळ्या ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यापैकी काहींना प्राथमिक उपचार देऊन सोडण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे अन् अजित पवारांची टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लवकर निघायचं होतं म्हणून कार्यक्रम भर दुपारी ठेवला का, असा सवाल ठाकरेंनी केला. तर मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. उन्हाळा असताना भर दुपारी कार्यक्रम ठेवणं ही आयोजकांची चूक आहे. तसेच रुग्णांची आणि मृतांची संख्या उघड झाली नसल्याचंही अजित पवार म्हणाले.