Join us

अमित शहा रुग्णालयात, अमिताभ बच्चन घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 6:23 AM

शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांची कोरोनावर मात

नवी दिल्ली /मुंबई : बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन रविवारी कोरोनावर मात करून आपल्या निवासस्थानी परतले. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित शाह यांनी स्वत:च ट्विट करून आपणास संसर्ग असल्याचे नमूद केले. आपली प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने टेस्ट करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अमिताभ बच्चन यांच्यावर सुमारे १५ दिवस नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना पाठविण्यात आल्याची माहिती आधी त्यांचे पुत्र व अभिनेते अभिषेक यांनी दिली. नंतर अमिताभ यांनी निवासस्थानी पोहोचल्यावर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमुळे मुळेच आपण घरी आलो आहोत, या शब्दांत त्यांचे आभार मानले. अभिषेक बच्चन यांनाही लागण झाली असून, त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. काही अन्य शारीरिक त्रासामुळे आपणास आणखी पाहू दिवस रुग्णालयात राहावे लागणार असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यातही कोरोनाच्या आजाराची काही लक्षणे असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. मात्र कोणताही त्रास होत नसल्याने पुरोहित यांना घरीच एकटे (होम आयसोलेशन) राहण्याचा सल्ला डॉक्टरानी दिला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर रविवारी यांनीही कोरोनावर मात केली. त्यांना आज रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. निलंगेकर ९१ वर्षांचे आहेत.महिला मंत्र्यांचे निधनउत्तर प्रदेशच्या तंत्रशिक्षणमंत्री श्रीमती कमलराणी वरूण यांचे आज कोरोनामुळे लखनौच्या सरकारी रुग्णालयात निधन झाले. त्या ६२ वर्षांच्या होत्या. त्यांना १८ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. गेले काही दिवस त्रास होत असल्याने आपण चाचणी करून घेण्याचे ठरविले आणि ती पॉझिटिव्ह आल्याचे स्वतंत्र देव सिंह यांनी म्हटले आहे.

टॅग्स :अमित शहामुंबईअमिताभ बच्चन