Join us  

उद्याच्या सभेची तयारी पाहायला अमित शाह मुंबईत, संजय राऊतांचा टोला  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 1:00 PM

या सभेसाठी आदित्य ठाकरे विशेष मेहनत घेत आहेत. ते बैठका घेत असल्याचे संजय राऊत म्हणाले. 

मुंबई : उद्या मुंबईमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. ते म्हणाले, अमित शाह उद्या आमची सभा आहे, त्या सभेची तयारी पाहण्यासाठी ते मुंबईत येत आहेत. ते नागपूरला सभा होते, तेव्हा देखील महाराष्ट्रात आले होते. उद्या महाविकास आघाडीची तिसरी सभा होत आहे. पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. दुसरी सभा नागपूरमध्ये झाली. तर तिसरी सभा उद्या राज्याच्या राजधानीत होत आहे. या सभेसाठी आदित्य ठाकरे विशेष मेहनत घेत आहेत. ते बैठका घेत असल्याचे संजय राऊत म्हणाले. 

यावेळी संजय राऊत यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकींवरही भाष्य केले. ते म्हणाले, शिवसेना महाविकास आघाडीसह कृषी उत्पन्न बाजार समितीसह निवडणुकीत उतरली होती. आपण आकडे पाहायले असतील तर महाविकास आघाडीली या निवडणुकीत यश मिळाले आहे. शेतकरी भाजपला वैतागले आहेत. त्यांनी या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना लाथ मारली आहे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत लोकांची मन की बात स्पष्ट झाल्याचे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला आम्ही स्वतःच्या ठिकाणी जात आहोत. बेळगाव ,कारवार सीमा भाग आहे. त्या ठिकाणी एकीकरण समिती खास करून महाराष्ट्राची शिवसेनेची व शरद पवारांची कमिटमेंट पाळत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील त्या ठिकाणी शिवसेनेची बेळगावची भूमिका स्वीकारली होती. ती आम्हाला विसरता येणार नाही. अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्राचे एकीकरण समितीच्यामागे उभे राहणार आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावमध्ये जाऊन महाराष्ट्राकीकरण समितीचा प्रचार केला पाहिजे, परंतु जे दिसत आहे ते उलटच दिसत आहे. येथून भाजपच्या ज्या टोळ्या गेलेल्या आहेत, त्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधातच काम करत आहेत, असे संजय राऊत म्हणाले. 

याचबरोबर, बारसूमधील लोकांवर आणखी अत्याचार सुरुच आहेत. तिथे पोलिस कारवाया सुरु आहेत. उद्धव ठाकरेंना सुद्धा पाय ठेवू दिला जाणार नाही अशी धमकी दिली जात आहे. पण आम्ही या धमकीला भीक घालत नाही. हिंमत असेल तर आडवा असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच कोकण हे कोणाच्या मालकीचे नाही शिवसेनेचे उर्जास्थान आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कोकणात जातील चिंता बाळगण्याचे कारण नसल्याचे राऊत संजय  म्हणाले. महाडमध्ये 6 मे दिवशी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आहे. त्यामुळे कोकणात शिवसेनेचे  पाय घट्ट आहेत. यापुढेही आणखी घट्ट होतील असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतअमित शाह