Join us

अमित शहा मुंबईत, मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत; सह्याद्री अतिथी गृहावर बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 11:47 PM

शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजप नेत्यांचा अयोध्या दौरा सुफल-संपूर्ण झाल्यानतंर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

मुंबई - भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री सातत्याने वेगवेगळ्या राज्यात दौरे करत आहेत. अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल दौरा केल्यानंतर आता अमित शहा २ दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. यावेळी, मुंबईतील विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांचे स्वागत केले. भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन अमित शहा निवडणुकांवर चर्चा करणार आहेत. 

शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजप नेत्यांचा अयोध्या दौरा सुफल-संपूर्ण झाल्यानतंर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज सायंकाळी मुंबईत आगमन झाले. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुप्षगुच्छ देऊन मुंबई विमानतळावर त्याचे स्वागत केले. नवी मुंबईतील खारघर येथे १६ एप्रिल रोजी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शहा यांच्याहस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे, अमित शहा उद्या या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. या सोहळ्यातून राजकीय शक्तीप्रदर्शन दाखवण्याचाही सत्ताधारी भाजप-शिवसेना पक्षाचा राजकीय अजेंडा आहे. 

दरम्यान, या सोहळ्याची इतिहासात नोंद घेतली जाईल, ' न भूतो न भविष्यती' असा हा कार्यक्रम होईल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी सोहळ्याच्या आयोजनात सहभागी अधिकारी, कर्मचारी, श्री सदस्य यांना सोहळा यशस्वीतेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले आहे.

असा आहे शहांचा दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. रात्री उिशरापर्यंत ते सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करतील. रविवारी सकाळी राजभवनमधून हेलिकॉप्टरने अमित शहा नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क येथे पोचतील. सकाळी साडेदहा वाजता तेथे अप्पासाहेबांना त्यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाईल. यानंतर शहा गोव्याला रवाना होतील.

फेब्रुवारीतही होते मुंबईत

पंतप्रधान मोदींनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १७ फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यादरम्यान त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी अमित शहांनी कोल्हापूरला देखील भेट दिली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. पुणे पोटनिवडणुकीच्या दरम्यानही अमित शहा यांनी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली होती. 

टॅग्स :अमित शाहएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमुंबई