"मणीपूर सांभाळायला अमित शहा खंबीर, मोदींनी जाण्याची गरज नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 06:35 PM2023-06-22T18:35:25+5:302023-06-22T18:36:41+5:30

राज्यात गेल्या काहि दिवसांपासून ठाकरे आणि फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

"Amit Shah is determined to take care of Manipur, there is no need for Modi to go", Devendra Fadanvis on uddhav Thackeray | "मणीपूर सांभाळायला अमित शहा खंबीर, मोदींनी जाण्याची गरज नाही"

"मणीपूर सांभाळायला अमित शहा खंबीर, मोदींनी जाण्याची गरज नाही"

googlenewsNext

मुंबई - राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि भाजपा यांच्यातील राजकीय वाद दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं राज्यव्यापी पदाधिकारी शिबीर मुंबईत पार पडलं. या शिबिरात बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी मणीपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरुनही उद्धव ठाकरेंनी मोदींना लक्ष्य केलं होतं. आता, यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. 

राज्यात गेल्या काहि दिवसांपासून ठाकरे आणि फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या टीकेला फडणवीसही जशास तसं उत्तर देत आहेत. मोदींनी लस तयार केली असं फडणवीसांनी म्हटलं होतं. त्यावरुन, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची खिल्ली उडवली. आता, फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत मी राज्य चालवलं म्हणजे काय घोड्यावर बसून चालवत होते का, असा  सवाल विचारला. तसेच, मोदींनी मणीपूरला जाण्याची गरजच नाही, त्यासाठी गृहमंत्री अमित शहाच पुरेसे आहेत, असेही फडणवीस यांनी म्हटलं. 

मोदींच्या अमेरिका दौऱ्यावरुन एक नेते म्हणाले की विश्वगुरू अमेरिकेला गेले, पण त्यांना मणीपूरला जायला वेळ नाही. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की, मणीपूर सांभाळायला गृहमंत्री अमित शहा हेच पुरेसे आहेत, तिथे मोदींनी जाण्याची गरज नाही. पण, तुम्ही मातोश्रीतून वरळीपर्यंतही गेले नाहीत. आणि तुम्ही मोदींना सांगता.. असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. 

मोदींनी देशासाठी लस तयार केली असं मी म्हटलं तर उद्धव ठाकरेंना जास्तच झोंबलं. मग उद्धव ठाकरे म्हणतात मी राज्य चालवलं... राज्य चालवलं... म्हणजे काय घोड्यावर बसून ते चालवत होते का, बैलबंडी हाकत होते, असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. 

मोदींनी भारतातील १४० कोटी लोकांना कोरोनाची लस मोफत देण्याचं काम केलं. आपल्या महाराष्ट्रात साडे सतरा कोटी लसी मोफत मोदींनी दिल्या. जर, कोरोनाची लस मोदींनी दिली नसती तर तुम्ही आम्ही बसू शकलो असतो का, असे म्हणत फडणवीसांनी मोदींमुळेच भारतात लस तयार झाल्याचं म्हटलंय. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे

सत्तेची मस्ती आहे, हा जो तुमचा फुगलेला फुगा आहे तो फोडायला वेळ लागणार नाही. एवढीच मस्ती असेल तर मणिपूरमध्ये दाखवा. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचे अधिकारी मणिपूरमध्ये पाठवा, परत येतात का बघा. अमित शाह मणिपूरमध्ये जाऊन आले पण उपयोग झाला नाही. मणिपूर राज्य पेटलेलं असून तुम्ही अमेरिकेत निघाला आहात. रशिया आणि यूक्रेन युद्ध थांबवल्याची भाकडकथा सांगतात. ते कथा खरी करायची असेल तर मणिपूरमध्ये जाऊन दाखवा.
 

Web Title: "Amit Shah is determined to take care of Manipur, there is no need for Modi to go", Devendra Fadanvis on uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.